बारामती : महान्यूज लाईव्ह
सध्या सगळीकडे जत्रायात्रांचा हंगाम सुरू आहे आणि गरमागरम सागुतीचा बेतदेखील.. पण हाच बेत जरा सावकाशीनं घ्या बरं का! कारण बारामती तालुक्यात अशी घटना घडली की, एखाद्या लहान मुलाच्या नाही तर 44 वर्षाच्या प्रौढ व्यक्तींनं मटन खाता खाता मटणाचा दीड सेंटीमीटर चा तुकडा चक्क श्वासनलिकेत अडकला. जीवाची घालमेल झाली.. अनेक तपासण्या झाल्या.. पण बारामतीतल्या डॉक्टरांनी अचूक वेळेत अचूक निदान करत या व्यक्तीचे प्राण वाचवले.
अर्थात या निमित्ताने बारामती मध्ये पहिल्यांदाच फ्लेक्झिबल ब्रोन्कोस्कोपीची गुंतागुंतीची, धोक्याची परंतु यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.. बारामतीतील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. गणेश बोके, राज्यात कोरोनाच्या काळात सुप्रसिद्ध झालेले नाक कान घसा तज्ञ डॉ. वैभव मदने व छातीच्या विकाराचे युवातज्ञ डॉक्टर आनंद गवसणे या तिघा देवदूतांच्या अथक प्रयत्नामुळे बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका प्रौढ व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.
घटना काल संध्याकाळची आहे पण बारामतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बारामतीतील वैद्यकीय क्षेत्रात महिलाचा दगड ठरलेली ही फ्लेक्सिबल ब्रोन्कोस्कोपीची शस्त्रक्रिया काल डॉ. बोके यांच्या दवाखान्यात यशस्वीरित्या पार पडली. पणदरे येथील 44 वर्षीय व्यक्तीला मटन खाता खाता ठसका लागला आणि खूप त्रास होऊ लागल्याने दम लागू लागल्याने ते तेथील स्थानिक डॉक्टर जगताप यांच्याकडे गेले.
तात्पुरती उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना बरे वाटले, परंतु पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी पुढील काही तपासण्यासाठी बारामतीत डॉ. बोके यांच्या तपासणीचा सल्ला दिला. संबंधित व्यक्ती डॉ. बोके यांच्या दवाखान्यात आली, तेव्हा बोके यांनी त्याच्या सर्व तपासण्या केल्या. मात्र त्यांना तरीही धाप लागत असल्याने बोके यांनी त्याच्या वैद्यकीय उपचाराची अधिक माहिती घेतली.
त्याचबरोबर लक्षणांची माहिती घेताना त्यांना लक्षात आले की, जेवता जेवता ठसका लागल्याने त्यांना हा त्रास सुरू झाला. त्यामुळे काहीतरी अन्नाचा घटक हा त्यांच्या शरीरात अन्ननलिकेत गेला असावा अशी शंका त्यांना आली. म्हणून त्यांनी स्कॅनिंग केले या स्कॅन मध्ये श्वासनलिकेत अन्नाचा कण त्यांना दिसून आला.
त्यामुळे आता हा कण काढण्यासाठी बारामतीत सुपरीक्षेत असलेल्या डॉ. मदने यांची मदत घेण्याचे त्यांना सुचले आणि त्यांनी डॉ. मदने यांना संपर्क साधला. डॉ. मदने यांनी तातडीने हॉस्पिटल गाठले. त्याचबरोबर छातीचे विकार तज्ञ डॉ. आनंद गवसणे यांनाही बोलवण्यात आले. आनंद गवसणे यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर ही धोक्याची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचे लक्षात आले.
मात्र या प्रकारात रुग्णाला भूल देता येणार नसल्याचे लक्षात आल्याने तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आणि रुग्ण जागा असतानाच व कोणतीही भूल न देता ही शस्त्रक्रिया करण्याची त्यांनी ठरवले. त्यानंतर डॉ. मदने व डॉ. गवसणे यांनी बारामतीत पहिल्यांदाच फ्लेक्झिबल ब्रोंकोस्कोपी हे तंत्र वापरले आणि या रुग्णाचा जीव वाचला. जवळपास दीड सेंटीमीटरचा हा मटणाचा तुकडा एक सेंटिमीटर व्यासाच्या अन्ननलिकेत अडकला होता. अवघ्या अर्ध्या तासात हा रुग्ण चालू लागला आणि त्याचा सर्व त्रास संपला.