बारामती : महान्यूज लाईव्ह
9 फेब्रुवारी रोजी बारामती आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग (रा. अकोला) व या मोर्चाचा आयोजक विकास महादेव देवकाते (रा. बांदलवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी अधिक माहिती दिली. 9 फेब्रुवारी रोजी बारामती मध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी कालीचरण महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ वाढेल असे वक्तव्य केले.
यावरून बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अतुल उत्तम जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून 24 एप्रिल रोजी पोलिसांनी भारतीय दंड विधान 153, 505(2), 34, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पालवे करीत आहेत.