किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
सणसर येथील रायतेमळा परिसरात निरा डावा कालवा फुटला आणि काही दिवसातच तात्पुरता केलेला भराव फुटल्याने एकूण दोन वेळा त्यातून पाणी वाहिले. त्याचा काही शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे जलसंपदा खात्यावर प्रचंड टीका झाली. मात्र ब्रिटिशकालीन मोरी पूर्णपणे काढून नव्याने मोरी करून हा कालवा फक्त १३ दिवसात वहनयोग्य करण्यात जलसंपदा खात्याने यश मिळवले आहे.
कालवा फुटल्यानंतर तेराव्या दिवशी जलसंपदा खात्याने हा कालवा वहन योग्य करून आजपासून आवर्तनाला देखील सुरुवात केली आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे उन्हाळी आवर्तन सुरू राहणार आहे. त्यामुळे करपून चाललेल्या पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी महान्यूज शी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली. जलसंपदा खात्याचे अधिकारी अहोरात्र या कामावर होते. त्यांनी युद्ध पातळीवर काम करून हा कालवा कमीत कमी दिवसात दुरुस्त करण्याची कामगिरी यशस्वी केली आहे. आता ही ब्रिटिशकालीन मोरी, जी दगडी बांधकामाची होती, त्याऐवजी पूर्णतः स्लॅब करून मोठ्या जलवाहिनीच्या माध्यमातून या पुढील काळात तेथे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. येत्या 30 जून पर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे.