राजेंद्र झेंडे: महान्यूज लाईव्ह
येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनादिवशी मी दौंड तालुक्यातील पाटस येथील मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यासमोर बसणार आहे. मी केलेले साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे विद्यमान आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. मी त्यांच्या घरी वर्षभर धुणीभांडी करीन असे आव्हान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांना दिले.
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरील कथित भ्रष्टाचारासंदर्भात काल संध्याकाळी वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या आवारात पोलखोल सभा झाली. या सभेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, शिवसेनेचे नेते शरद कोळी यांच्यासह शिवसेनेचे इतरही नेते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी 36 कोटी रुपये दिले तरी कारखाना चालू झाला नाही, मात्र कर्नाटकच्या माणसाला कारखाना चालवायला दिल्यानंतर तोच कारखाना, तीच मशिनरी, तेच कामगार, तोच परिसर, तोच ऊस, मग कारखाना कसा चालू झाला? कारखाना जर चालूच होता तर मग बंद का ठेवला होता? सर्वसाधारण सभा झाली, एक ते बारा विषय मंजूर आणि आता ऐन वेळच्या विषयावर बोला असं म्हणत कोणाला बोलू न देता वर्षानुवर्ष अशाप्रकारे काम करता.
कारखान्यामध्ये 70 हजार कोटी होती. दोन वर्ष मी ही पोती मोजण्याची परवानगी मागत होतो मी सभासद आहे मला अधिकार आहे परंतु मला परवानगी मिळाली नाही ती पोती मोजण्यासाठीचा खर्च देखील द्यायला मी तयार होतो. अहवाल सालामध्ये मात्र धक्का बसला की, त्यातील 43 हजार पोती जळाली. एवढी पोती जळाली, तर त्याला इन्शुरन्स का मिळाला नाही? 127 कोटी रुपये अनामत तिचा कुठलाच हिशोब नाही. ते आणले कुठून आणि दिली कोणाला?
पोलिसांकडे मागणी केली मात्र पोलिसांनी हात वर केले. वरिष्ठांकडे तक्रार केली तरी काही दखल घेतली नाही. शेवटी न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने मात्र गुन्हा दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. चार एप्रिल रोजी अखेर माझा जबाब नोंदवून घेतला. जेव्हा पाचशे रुपयात एक एकर जमीन येत होती, तेव्हा वाडवडिलांनी पाचशे रुपये देऊन या कारखान्याची भाग खरेदी केलेले आहेत. त्याच्या जीवावर हा भीमा पाटस कारखाना उभा राहिला आहे. मात्र आज शेअरची किंमत शून्य आणि त्या एका एकर जमीनीची किंमत मात्र 25 लाखावर पोचली आहे. मग जर तो एकर 25 लाखावर पोहोचला, तर आमचा शेअर कुठे पोहोचायला हवा होता?
कोण निराणी? कुठून आला? 6 मार्च रोजी त्याच्याबरोबर करार झाला आणि त्याने डिसेंबर मध्ये कारखाना सुरू केला. सत्तेची मस्ती फार काळ टिकत नाही. लहानपणापासून आम्ही ऐकत आलो, रावणाच्या पायाखाली नवग्रह होते. त्या रावणाची सत्ता टिकली नाही, तुमची तर काय गत? पोलिसाच्या काट्यांच्या आधाराने सत्ता टिकवता, काठी आज आहे, उद्या असणारच असं नाही. कामगारांचे 35-35 कोटी रुपये देणी राहिलेली आहेत, कामगार कुठवर सहन करतील?
या कारखान्याचे ४९ हजार सभासद आहेत. या सर्व सभासदांनी केंद्रीय सहकार मंत्रालय एक पत्र पाठवावे. देशातील सहकारातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय उभे केले आहे.