शिरूर : महान्युज लाइव्ह
उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिले जाणारे पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पुणे ग्रामीण पोलिस दलात सात अधिकाऱ्यांना जाहीर झाले आहे. यात शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, विक्रमसिंह तापकीर यांचा समावेश आहे.
राज्यात पोलिस दलात उत्कृष्ट तपास,उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक देण्यात येते. यावेळी राज्यातील ८०० पोलिस अधिकारी व अंमलदार यांना हे जाहीर करण्यात आले आहे.
शिरूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांची ही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदकासाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय पोलिस निरीक्षक संतोष जाधव,स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विक्रमसिंह तापकीर, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांची पुणे ग्रामीण मधून निवड करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी अनेक गुन्ह्यात स्वतः लक्ष घालून गुन्हे उघडकीस आणले आहे तर बँक दरोड्याचा तपास करत आरोपींना गजाआड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार जनार्दन शेळके यांनी राज्यात गाजलेल्या सिद्धू मुसेवाला प्रकरणात आरोपी निष्पन्न करत अटक करण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लूट करणारी टोळी जेरबंद केली आहे.
मध्यप्रदेश तसेच तामिळनाडू या परराज्यात जाऊन महाराष्ट्रात चोरी, दरोडे करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. पुणे नगर महामार्गावर चोरी करणाऱ्या अनेक आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली. सिगारेट व मेडीसिन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आंतरराज्य टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदकासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.