बारामती : महान्यूज लाईव्ह
20 एप्रिल रोजी बारामतीतील देवकाते पार्क येथील सागर गोफणे यांच्या घरात शिरूर तीन चोरट्यांनी महिलेचे हातपाय बांधून घरातील 63 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्या चोरट्यांची छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली असून, यासंदर्भात काही माहिती असल्यास बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी या तिघांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून, या चोरट्यांनी 20 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता देवकाते पार्क येथे सागर गोफणे यांच्या घरात घुसून तृप्ती सागर गोफणे या महिलेचे हातपाय बांधले व घरातील 55 लाख रुपयांच्या रोख रकमेसह साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल असा मिळून 63 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
पोलीस या आरोपींच्या शोधात आहेत. दरम्यान या संदर्भात बारामतीत अनेक ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असून, पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार देखील तपासण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलेल्या या चोरट्यांची छायाचित्रे आता पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत.
यातील आरोपी आणि त्यांच्या हालचाली संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या 9011960200, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (8424050500), स्थानिक गुन्हे शाखा फौजदार गणेश जगदाळे (9767918206), तपासी अधिकारी व फौजदार राजेश माळी (9767652331) या क्रमांकावर अथवा फौजदार गणेश जगदाळे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या 9767118206 या क्रमांकावर संपर्क साधावा.