राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज संध्याकाळी वरवंड येथील नागनाथ विद्यालयासमोर जाहीर सभा होत आहे. भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेला शिवसेना उपनेत्या प्राध्यापक सुषमा अंधारे व काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे उपस्थित राहणार आहेत मात्र त्यापूर्वीच आज सकाळी प्रांताधिकार्यांनी पाटस परिसराला कलम 144 हे प्रतिबंधात्मक कलम लागू केले आहे.
वरवंड येथे होत असलेल्या सभेपूर्वी खासदार संजय राऊत हे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्या समोरील संस्थापक मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत, मात्र या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
पुतळ्याचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो, हे कारण पुढे करून पोलिसांनी या पुतळ्याच्या अभिवादनाला परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे प्रांताधिकाऱ्यांनी देखील कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे सभा संध्याकाळी होणार असली तरी सभेपूर्वी तेथील वातावरण तापले आहे.
दरम्यान माजी आमदार व आयोजक रमेश थोरात यांनी मात्र आम्ही पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार असून आम्ही शांततामय वसनशीर मार्गाने अभिवादन करणार आहोत असे सांगितले. दरम्यान ही सभा खूप मोठी होईल, या सभेसाठी पंधरा ते वीस हजार लोक येतील असा दावा केला असून, या सभेत संजय राऊत हे या कारखान्यासंदर्भातील सर्व भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.