पुणे : महान्यूज लाईव्ह
लग्नात बऱ्याचदा तयार केलेलं जेवण शिल्लक असतं हे शिल्लक जेवण कोणाचं? यावरून कधीच वाद होत नाही. बहुतेकदा हे शिल्लक जेवण एक तर आसपासच्या अनाथालयात वाटलं जातं किंवा ज्यांच्याकडे लग्नाची जबाबदारी असते त्या वर किंवा वधूच्या नातेवाईकांकडून हे भोजन नेलं जातं. पुण्यातील शेवाळवाडीत मात्र असा एक प्रसंग घडला की, त्यामध्ये लग्नात उरलेले गुलाबजाम कुणाचे यावरून सुरू झालेली बाचाबाची हाणामारीपर्यंत पोचली आणि पोलीस ठाण्यात देखील पोहोचली.
पुण्यातील शेवाळवाडी परिसरातील राजयोग मंगल कार्यालयात हा प्रकार घडला. हे कार्यालय कमलदीपसिंग यांनी चालवण्यासाठी घेतले असून या ठिकाणी रविवारी लोखंडे परिवाराचा विवाह होता. या लग्नातील जेवणाच्या व्यवस्थेचे काम पंजाब ग्रील हॉटेल या कमलदीप सिंग यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक असलेला व्यवस्थापक दीपांशू गुप्ता याच्याकडे ही जबाबदारी होती.
लग्न झाल्यानंतर सर्व नातेवाईकांची जेवणे झाली. संध्याकाळी सहाच्या सुमारास वर पक्षाकडे एक व्यक्ती स्वयंपाक घरात येऊन राहिलेले जेवण घ्यायचे आहे असे सांगू लागली. त्यावर गुप्ता यांनी हे शिल्लक जेवण नेऊ शकता असे सांगितले. मग या व्यक्तीने आणखी दोन माणसे सोबत आणली आणि ते सर्व जेवण डब्यामध्ये भरू लागले.
यावेळी एका डब्यात गुलाबजाम भरले जात असताना व्यवस्थापक गुप्ता यांनी हे गुलाबजाम तुमच्या लग्नातले नसून, उद्या होणाऱ्या लग्न सोहळ्यातील आहेत तुम्ही ते भरू नका असे म्हटले. याचा राग येऊन तेथे आलेल्या तिघांनी गुप्ता यांना डोक्यात झारा मारून जखमी केले. दरम्यान या घटनेनंतर गुप्ता यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.