बळपुडी गावच्या पोलीस पाटील यांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर अडीच वर्षांनंतर यश..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : गावामध्ये पोलीस पाटील यांना विशेष महत्त्व आहे. गावातील माहिती, भांडणतंटे झाल्यास पोलिसांसाठी गावचे पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा म्हणून कामकाज पाहत असतो. न्याय मिळवून देण्यासाठी गावच्या पोलीस पाटलाची महत्वाची भूमिका असते. अशा परिस्थितीत जर पोलीस पाटलावरच अन्याय झाला तर दाद मागायची कुणाकडे ? असा प्रश्न उपस्थित होतो.
पोलीस प्रशासनाने ज्यात लक्ष घालणे अपेक्षित असताना, न्यायासाठी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस पाटील जेव्हा पोलीस ठाण्यात येतो पण त्याची तक्रार घेतली जात नाही, अशावेळी पोलीस पाटलाला अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो आणि अखेर अडीच वर्षांनी पोलीस पाटलाला न्याय मिळतो.
न्यायालयाने पोलीस पाटलाला मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. ही घटना दूरची नाही तर हा प्रसंग घडलाय बळपुडी गावच्या पोलीस पाटलाबाबत..! रस्त्यासाठी झालेली भांडणे मिटवण्यासाठी गेल्यानंतर आडदांड इसमांकडून पोलीस पाटील व त्यांच्या भावाला सप्टेंबर २०२० मध्ये बेदम मारहाण झाली.
मारहाण झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांना गावात सलोखा राखण्याचा प्रयत्न करणा-या व पोलीसांना मदत करणा-या पोलीस पाटलाची फिर्याद पोलीसांनी टाळाटाळ केल्यानंतर न्यायालयाकडे दाद मागणा-या बळपुडी पोलीस पाटलाला अडीच वर्षानंतर यश आले आहे.
न्यायालयाने सहा जणांवर नियमीत फौजदारी खटला दाखल करण्याकरिता हे प्रकरण पुनर्नोंदणीसाठी पाठवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या वतीने आरोपींना समन्स ही पाठवण्यात आले आहे. प्रमोद रानबा पाटील तथा लालासाहेब रानबा काळेल (रा. बळपुडी,ता.इंदापूर) असे न्यायालयीन लढा देणा-या पोलीस पाटलांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, दि.२७ सप्टेंबर २०२० रोजी रस्त्यासाठी झालेले भांडण मिटवण्यासाठी आलेल्या पोलीस पाटील प्रमोद पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना सोडवण्यासाठी तेथे आलेल्या भावालाही आरोपींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणाची तक्रार घेण्यास इंदापूर पोलीसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली. ॲड. संदीप पाटील यांच्या तर्फे १५६ (३) अंतर्गत दावा दाखल केला. न्यायालयाने पोलीसांकडून अहवाल मागवला असता, आरोपी व आरोपीतर्फे पाच साक्षीदारांनी पोलीस तपासात संशयास्पद जबाब दिल्याचे आढळून आले.
न्यायालयाने पोलीस पाटील यांनी न्यायालयासमोर केलेले विधान, कागदपत्रे व पोलीस पाटलांचे वकील ॲड. संदीप पाटील यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यावरुन इंदापूर न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. साळुंखे यांनी सर्व सहा आरोपींच्या विरुद्ध कलम १४३, १४७, १४८, ३५३, ३२३, ५०४ व ५०६ कलम १४९ सह इ .पी.को. नुसार व कलम ५४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आदेशिका काढण्यात याव्यात. हे प्रकरण नियमीत फौजदारी खटला म्हणून पुनर्नोंदणीसाठी पाठवण्यात यावे असा आदेश दिला.