अॅड. योगेश वाघ, बारामती
दुपारी सत्र न्यायालयात मध्ये एक वरिष्ठ वकील इंग्रजीत फाडफाड युक्तिवाद करत होते. जाणारे येणारे वकील मित्र, मैत्रिणी नवीन काहीतरी ऐकायला व शिकायला मिळेल, म्हणून कोर्टरूम मध्ये गर्दी करून उभे होते. त्यात अनेक पक्षकार, कारकून आपापली कामे करत होती. माझं काम संपल्यामुळे मी ही रेंगाळलो होतो. दिवस चांगला चालू होता. तेवढ्यात अर्ग्युमेंट संपलं आणि लगेच सरकारी वकिलांनी समोरची नवीन केस न्यायाधीशसाहेबांना सांगून चालू केली.
या वकिलांनी मागे वळून गर्दीत भिंतीला चिकटून उभ्या असलेल्या एका महिलेच्या पदराआड उभ्या असलेल्या मुलीकडे बघून तिला म्हणाले, ये बाळ तुला इथं साहेबांशी बोलायचंय. ये तुला चॉकलेट देतो..! सरकारी वकिलांच्या या वाक्याबरोबर त्या छोट्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. चेहरा घाबरून गेला.
तिने तिच्या आईला घट्ट पकडलं आणि म्हणाली “नको
‘चॉकलेटची भीती वाटती’.. तिच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं. तिला पकडून ती हळू आवाजात म्हणाली. चॉकलेटमूळ माझ्या पोरीवर ही वेळ आली साहेब, तिला भीती वाटते चॉकलेटची . . .
मी त्यांच्या जवळच उभा होतो. माझ्या काळजाचं तर पाणी पाणी झालं. कोर्टाने सर्व वकील व इतर सर्वांना बाहेर काढलं, इन कॅमेरा सत्र न्यायालयात कामकाज सुरू झालं. कोर्टरूममधून बाहेर येताना माझे पाय थरथरत होते. डोकं अनेक विचार प्रवाहानी सुन्न झालं होतं. काळजात खोल गडबड झाली होती.
मी जवळचा कठडा पकडला. आजूबाजूला पाहिलं बहुतेक जणांना हे रेग्युलर असावं किंवा समजलं नसावं, आतमध्ये नेमकं काय झालंय? मला सगळी केस समजली होती आणि मनाने न्याय ही केला होता. मी कोट काढला आणि हळूहळू चालत ऑफीसकडे आलो, पुढचा राहिलेला दिवस वरवरच हसत गेला पण आत्मा त्या चॉकलेट भोवती घोंघावत राहिला. चॉकलेटची भीती जगातल्या कशाच्याही भीतीपेक्षा मोठी असते असं आता वाटतंय मला..!