दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील भांडगाव जवळ प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवास अनेक प्रवासी गंभीरित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी खाजगी बस ही दौंड तालुक्यातील भांडगाव हद्दीत हॉटेल झोपडीच्या समोर पलटी होऊन अपघात झाला आहे. सोमवारी (दि. २४ ) रात्री ९ वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. या अपघातात काही प्रवाशी गंभीर तर काहींना किरकोळ जखमी झाले. अपघातात महिला पुरुष व लहान मुलांचा देखील समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी प्रवाशांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे पुणे सोलापूर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
मागील काही दिवसांपूर्वी पुणे सोलापूर महामार्गावर मळदजवळ अशीच खाजगी बस पलटून दुर्घटना मोठी घडली होती. पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस पलटून अपघात होण्याच्या घटनेत अलिकडे मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे.