बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती नगरपरिषद, आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १००० विद्यार्थ्यांची भव्य ई-कचरा संकलन व जनजागृती फेरी आयोजित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भागवत चौधर यांनी दिली.
ही फेरी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, पेन्सिल चौक, सूर्यानगरी, सिटी-इन चौक, तांबे नगर संभाजीनगर, महिला सोसायटी परिसरातून गेली व ई-कचरा व्यवस्थापनाविषयी त्या परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली व ई कचरा संकलन केले.
या फेरीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले. या फेरीच्या माध्यमातून खराब मोबाईल, टीव्ही ,पेन ड्राईव्ह ,खराब सेल ,घड्याळ, लाईट बल्ब, माऊस, की-बोर्ड, खराब वायर, कॅल्क्युलेटर व खराब झालेल्या इलेक्ट्रीक वस्तूंचे संकलन केले.
या परिसरातील नागरिकांनी वरील वस्तू कच-यात फेकण्याऐवजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ई-कचरा फेरी दरम्यान सुपूर्द केल्या. ही फेरी यशस्वी होण्यासाठी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील सर्वं शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी , बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आणि माजी विद्यार्थी संघातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या फेरीदरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ई कचरा व्यवस्थापनावर सादर केलेले पथनाट्य लक्षवेधी ठरले. बारामती येथील लोकप्रिय नेते व संस्थेचे विश्वस्त आदरणीय अजितदादा पवार यांनीसुध्दा स्वतः पथनाट्य पाहिले व सादरीकरण करणा-या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. या इ कचरा जनजागृती व संकलन स्पर्धेत पोस्टर प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांंचा दादांच्या हस्ते करण्यात आला.
अजितदादांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून आपण कोठून आलाय, कोणत्या शाखेत शिक्षण घेत आहात, बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मध्येच का यावेसे वाटले? असे प्रश्न विजेत्या विद्यार्थ्यांना विचारले व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.