राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व दौंड शिवसेनेचे नेते महेश पासलकर यांनी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा दिला आहे. अशी माहिती महेश पासलकर यांनी दिली.
दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची येत्या २६ एप्रिलला दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र खासदार राऊत यांची सभा होण्यापूर्वीच पुणे जिल्ह्यात शिवसेनेसह महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
जिल्हाप्रमुख शिवसेनेचे नेते महेश पासलकर यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने दौंड तालुक्यातील राजकारणात आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.
दौंड चे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश थोरात यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे खासदार संजय राऊत यांचे भेट घेऊन दौंड येथे जाहीर सभा घेण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार येत्या २६ एप्रिलला खासदार राऊत यांची सभा आयोजित केली. मात्र दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला एकही जागा सोडली नसल्याने महेश पासलकर हे नाराज असल्याचे शिवसेना गोटातून बोलले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी महेश पासलकर यांनी खासदार संजय राऊत यांची दौंड येथे सभा होणार नसल्याचे माध्यमांना सांगितले होते, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांची सभा दौंड मध्ये सभा होणारच असे ठामपणे रमेश थोरात यांनी सांगितले होते. त्यामुळे दौंड तालुक्यात संभ्रम निर्माण झाला होता.
दौंड तालुक्यात भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात हे दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने उभे असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पासलकर यांनी राजीनामा दिला आहे.
पासलकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांनी प्रभावित होऊन १९९४ पासून शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन अंधेरी, मुंबई येथील शाखेतून उपशाखा प्रमुख पदापासून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतले होते. शिवसेना ही ग्रामिण भागात पोहचवण्यासाठी त्यांनी मुंबई सोडून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याची वाट धरली.
पुणे सोलापूर महामार्ग लगत चौफुला या ठिकाणी शिवसेनेचे अद्ययावत असे कार्यालय उभे केले आणि शिवसेनेचे कार्य व विचार पोहचवण्याचे काम केले. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यात सभा होण्यापूर्वीच पासलकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीकडून दिवंगत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना संपवायची सुपारी घेतली आहे. या नेत्यांमुळेच शिवसेनेतून ४० आमदार फुटले आहेत. असा खळबळजनक आरोप पासलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर केला आहे.