विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बऱ्याच दिवसानंतर बारामती दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बारामतीतील माहितीच्या सभागृहात जनता दरबार घेतला आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पत्रकारांनाच चांगले सुनावले.
आज अजित पवार यांना पत्रकारांनी तुम्ही एका मुलाखतीमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे आपण म्हणालात. मात्र त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे म्हटले आहे, त्यावर तुमचे मत काय? असे विचारता अजित पवार उसळून म्हणाले, 2024 कशाला? बहुमत असेल, तर आत्ताच मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल तुझ्या का पोटात दुखते?
आज अजित पवार यांनी सतत त्यांच्या मागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या पत्रकारांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यांचा तोच मूड पत्रकार परिषदेतही कायम होता. त्यामुळे जेव्हा त्यांना इतरांनी असे आरोप केलेले आहेत, त्यावर तुमचे मत काय? असे तेच तेच प्रश्न विचारत गेल्याने त्यांनी पत्रकारांना चांगलेच सुनावले.
ते म्हणाले, मूळ राज्यातले प्रश्न सोडून तुम्ही फक्त हेडलाईन व्हावी म्हणून जर कोणी बोलत असेल आणि त्याच्या हेडलाईन करत असाल तर ते बरोबर नाही. आज शेतकऱ्यांच्या शेतावरती गारपीट झाली, अनेकांना भरपाई मिळालेली नाही. राज्यातले अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते सोडून तुम्ही निव्वळ काहीतरी राजकारणाचे प्रश्न विचारता आणि मूळ प्रश्न बाजूला ठेवता हे बरोबर नाही. हे असे म्हणतात आणि ते तसे म्हणतात एवढेच प्रश्न तुम्ही विचारता!
निवडणुकीच्या जाहीर सभांच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडतील. त्यावेळी आरोप होतील, मात्र आता तुम्ही शेतकऱ्यांच्या अतिशय राज्यातील महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे, खारघरच्या घटनेवर बोलायला हवे, मात्र तुमच्या हातात दांडकी आणि कॅमेरा आला की तुम्ही काहीही वेगळेच विचारत सुटता हे बरोबर नाही.
देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत! असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर अजित पवार उसळून म्हणाले, त्यांच्या पार्टीचा काय विषय आहे, त्याच्याशी मला काय देणे घेणे आहे? मला एक कळत नाही, मला हा प्रश्न का सारखा विचारला जातो? कोण काय बोलतो आणि कोणाच्या पार्टीमध्ये काय चालतं हे मला विचारायचा काय अधिकार आहे? जे महत्त्वाचे असेल, जे माझ्याकडून तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर ते विचारले पाहिजे.
अमृता फडणवीस यांनी अजित दादांचे कौतुक केले! असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, त्याच्यामध्ये वाईट काय आहे? सत्ताधाऱ्यांचा सूर बदलला तर तुमच्या पोटात दुखायची कारण काय? प्रत्येकाने चांगले काम करावे, जेणेकरून प्रत्येकाला लोकांनी चांगले म्हणावे. मी एकटाच नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणीही चांगले काम केले, तर त्याचे कौतुक होईल. कोणी काय बोलावं, हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्याला मी काय बोलू?
मुंबईच्या सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. या संदर्भात मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आदित्य ठाकरे यांच्याशीही बोललो. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या सभेच्या परवानगीची व्यवस्था होईल असे सांगितले त्यामुळे मी निश्चिंत आहे असे पवार म्हणाले.