बारामती – महान्यूज लाईव्ह
कानून के हात बडे लंबे होते है.. ये पुलीस है सब जानती है.. हे सारे माहिती असतानाही महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेले बॅनर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या सहायक फौजदार भालचंद्र साळुंखे यांनी दारू पिवून दगडे मारून फाडला अशी फिर्याद वडगाव निंबाळकर पोलिसांकडे आली, गंभीर प्रकार व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल केला. मात्र त्याचा तपास झाल्यानंतर खरे आरोपी समोर आले.
१४ एप्रिल रोजी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास वडगाव निंबाळकर गावातील होळ चौकात जयंतीनिमित्त लावलेले बॅनर हे सहायक फौजदार साळुंखे यांनी फाडले अशी फिर्याद आकाश संजय साळवे याने दिली होती. त्यावरून पोलिसांनी लागलीच अॅट्रॉसिटीचा व सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला होता व वातावरण निवळण्यासाठी संयमाची परिस्थिती निर्माण केली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक दृष्टीनेही तपास केला, तेव्हा या घटनेतील फिर्यादी आकाश संजय साळवे व त्याचे साथीदार जयंत हरिश्चंद्र हिरवे, मोहन दौलत बनकर, संतोष तुकाराम हिरवे, मुकेश हनुमंत माने (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्याकडेही पोलिसांनी तपास केला.
तेव्हा या तपासादरम्यान सहायक फौजदार भालचंद्र साळुंखे यांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून होळ चौकातील जयंतीचा बॅनर या पाच जणांनी फाडल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी आकाश संजय साळवे व त्याचे साथीदार जयंत हरिश्चंद्र हिरवे, मोहन दौलत बनकर, संतोष तुकाराम हिरवे, मुकेश हनुमंत माने (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
वरील पाच जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून या गु्न्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपपर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभगीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार योगेश शेलार, शरद वेताळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, महेंद्र फणसे, सूर्यकांत कुलकर्णी, अनिल खेडकर, सागर चौधरी, हिरामण खोमणे, कुंडलीक कडवळे, हृदयनाथ देवकर, भाऊसाहेब मारकड, पोपट नाळे, अमोल भुजबळ, संतोष जावीर, विलास ओमासे यांच्या पथकाने अविरत काम केले.