बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील तक्रारदाराने पोलीस कंट्रोल रूमला केलेल्या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न होत होते, या प्रकरणी दंड म्हणून पोलीस शिपाई संतोष जगन्नाथ पवार याने साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संतोष पवारला रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने पोलीस कंट्रोल रूम पुणे येथे तक्रार केली होती. या तक्रारीचा तो सतत फॉलोअप घेत आहे म्हणून आणि त्याने केलेल्या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेचा गैरवापर होत आहे त्यामुळे याचा दंड म्हणून संतोष पवार याने तीन हजार एकशे पन्नास रुपयांची लाच मागितली.
तडजोडीअंती तीन हजार रुपयाची लाच ठरली.
यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले व त्याची तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत पवार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून 21 एप्रिल रोजी सापळा रचला असता, तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पवार याला लाच लचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, पोलीस शिपाई सुराडकर, चालक पोलीस नाईक गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी या पथकाला मार्गदर्शन केले.