बारामती : महान्यूज लाईव्ह
रात्री अकराची वेळ.. स्थळ माळावरच्या देवीच्या मंदिरासमोरील रस्ता.. इंदापूर तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस त्यांच्या पत्नीसह दवाखान्यातील रुग्णाला भेटायला निघालेले… अचानक एक पल्सर पुढे येते.. रोडरोमिओ किंवा सडकसख्याहरी वाटेल असे डोक्यावरचे केस आणि दाढी मोठी वाढवलेला एक भुरटा या पोलिसावरच खेकसतो.. स्वतः पोलीस असल्याचा आव आणतो..!
बारामतीत आत्तापर्यंत तुमची गाडी पाठीमागे एका दुचाकीला घासली आहे आणि तुम्ही तसेच पुढे आला आहात असे सांगून लुटणारे स्थानिक भुरटे गेल्या काही वर्षात आढळले, पण आता चक्क पोलिसांचे नाव वापरून चोरटे हे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना लुटत असावेत अशी शंका येते. 21 एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा ते अकराच्या सुमारास अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये खऱ्याखुऱ्या पोलिसाला लुटायचा प्लॅन या भुरट्यांनी केला होता.
संबंधित पोलीस कर्मचारी हे इंदापूर तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते त्यांच्या पत्नीसह रात्री उशिरा दवाखान्यात असलेल्या नातेवाईकांना भेटायला निघाले होते. अचानक एक पल्सर त्यांच्यासमोर उभी राहिली. या पल्सर वरील एका भुरट्याने या पोलिस महाशयांना एवढ्या रात्री इथे काय करत आहात? असा प्रश्न केला.
या प्रश्नाने या पोलीस कर्मचाऱ्याला धक्का बसला. त्याने प्रतिप्रश्न करीत हे विचारणारा तू कोण? असे विचारले असता, त्याने राणा भीमदेवी थाटात आपण पोलीस आहोत, मी कारवाई करेल असे त्यांना सांगितले. त्यावर या पोलीस महाशयांनी मीच पोलीस आहे, तू नक्की कोण आहे ते सांग आणि तुझे ओळखपत्र दाखव असे म्हणताच त्या भुरट्याची भंबेरी उडाली. मग त्याने आपण होमगार्ड आहोत असे सांगायला सुरुवात केली. वानगीदाखल त्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांची देखील ओळख सांगितली.
मग मात्र या पोलीस कर्मचाऱ्याने त्याची हजेरी घेण्यास सुरुवात केली, होमगार्ड असशील तर तुला असा पेहराव करण्याची परवानगी कोणी दिली आणि रात्रीच्या वेळी सोबत पोलीस कर्मचारी नसताना परस्पर लोकांना अडवण्याची परवानगी तुला कोणी दिली? असे विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, सुरुवातीला त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव सांगितले, मात्र पुन्हा प्रश्नांची सरबत्ती जशी सुरू झाली, तेव्हा मात्र या भुरट्याला त्याचे भविष्य कळाले आणि तो जसा आला होता, तसाच त्यापेक्षा जास्त वेगाने या दुचाकीवरून पसार झाला. रात्रीचा अंधार आणि समोरासमोर गाडी असल्याने, तसेच पत्नी सोबत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीचा संपूर्ण नंबर टिपता आला नाही, मात्र गाडीचा रंग आणि काही क्रमांक या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले.
पोलिसाचे नाव घेऊन पोलिसालाच लुटण्याचा हा बेत होता का? हा प्रश्न देखील या निमित्ताने पडला असून, याच ठिकाणी सामान्य व्यक्ती असता तर त्याला या पल्सरवरील भुरट्यांनी नेमके काय केले असते? सोडले असते का? मुळात एखादी सामान्य व्यक्ती असेल तर त्याला हे लुटल्याशिवाय सोडणार नाहीत, हे देखील सरळच दिसत असल्याने या देखील प्रश्नाचे काहूर या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आतापर्यंत अशा संदर्भातील गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झालेले नाहीत, मात्र एखाद्या प्रेमी युगुलांना अशाप्रकारे हे भुरटे त्रास देऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी पावले उचलावीत अशीच या निमित्ताने अपेक्षा.