पुणे : महान्यूज लाईव्ह
चार पाच दिवसांपूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा अवकाळीचा फेरा पुण्यासह महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये आपला इंगा दाखवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, सावधान! मुसळधार पाऊस तर पडेलच पण कदाचित गारपीटही होऊ शकते.
मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडू पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात सतत हवामानामध्ये बदल होतोय. कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण तामिळनाडू पर्यंत पसरला आहे. तेलंगणापर्यंत असलेला त्याचा प्रभाव लक्षात घेत मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या अकरा जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा पाऊस पुढील पाच दिवस राहील अशी शक्यता पुण्याच्या हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, नगर, नाशिक, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बीड, धुळे, जळगाव, अकोला, नागपूर अमरावती, यवतमाळ या मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडू शकतो. त्यामुळे या अकरा जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी यलो अलर्ट लागू केला आहे.











