दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत व टोल नाक्यापासुन काही अंतरावर असलेल्या एका फर्निचर च्या दुकानाच्या अज्ञात चोरांनी मागील बाजुचा पत्रा कापुन पुन्हा आतील पत्रा कापुन शेजारील दुकानात प्रवेश करून १५ हजारांच्या तांब्याच्या तारांची चोरी करून सलग चार दुकाने जाळली.
या दुकानातील फर्निचर व इतर दुकानातील साहित्य जळुन खाक झाले असून तब्बल ४५ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पत्रांच्या गाळांच्या दुकानातील विविध व्यवसायिकांची दुकाने आहेत.
अज्ञात चोरांनी मंगळवारी (दि.१८ ) व बुधवारी (दि १९) दरम्यान रात्रीच्या सुमारास नागेश्वर फर्निचर या दुकानातील पाठीमागील बाजूचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला आणि पुन्हा दुकानातील पत्रा कापुन शेजारील योगेश सुरेश कोंडे यांच्या दुकानात प्रवेश करून चोरांनी दुकानातील १५ हजार किंमतीच्या तांब्याच्या तारांचे चार बंडल चोरले आणि जाताना मारूती बाबु सातपुते, यांच्या वेल्डिंगचे दुकान, संजय गाढवे यांचे दुकान , फर्निचरचे दुकानला आग लावली.
या आगीत, फर्निचर च्या दुकानातील साहित्य, वेल्डींगच्या दुकानातील वेल्डिंग चे विविध २ लाख २० हजारांचे साहित्य, इतर व्यवसायिकांची शेजारी दुकाने अशी चार दुकाने या अज्ञात चोरटयांनी जाळली. यामध्ये या व्यावसायिकांचे अंदाजे ४५ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणी नागेश्वर फर्निचर दुकानाचे सतिश दशरथ कुसकर यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाटस पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन याप्रकरणी पंचनामा केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.