इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यात भलेही सत्तेत भाजप आणि शिंदे गट एकत्र असला तरी इंदापुरात मात्र या युतीचे तीन तेरा वाजले आहेत. बाजार समितीत आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते उमेदवार म्हणून एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मात्र आपली चूल वेगळी मांडत या बाजार समितीमध्ये सत्ताधारी आप्पासाहेब जगदाळे यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे!
आम्हाला कोणी विचारले नाही, सहकाराच्या निवडणुका बिनविरोध हव्यात अशी आमची भूमिका असून आम्ही या निवडणुकीत उभे राहणार नाही, भाजप म्हणून कोणीही यामध्ये असणार नाही असे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले असले, तरी त्यांचेच बिनीचे शिलेदार या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र निवडणूक लढवणार आहेत! अर्थात सहकारी संस्थेत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवण्याची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार म्हणता अखेर लागलीच. समितीच्या 18 जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या, आप्पासाहेब जगदाळे यांचे नेतृत्वाखालील सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलनेच या चारही जागा आपल्या खिशात घातल्या असून, त्यामध्ये मोहोळचे आमदार यशवंत माने यांचाही समावेश आहे. मात्र उर्वरित 14 जागांसाठी अपक्ष आणि दोन पॅनल मधून 34 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.
या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेतकरी विकास पॅनल या सत्ताधारी पॅनलच्या वतीने 14 जागांसाठी 14 उमेदवार उभे करण्यात आले असून, या पॅनलमधून मोहोळ चे आमदार यशवंत माने, हमाल व तोलारी गटातून सुभाष ज्ञानदेव दिवसे, व्यापारी व आडते मतदारसंघातून दशरथ नंदू पोळ आणि रौनक किरण बोरा हे चार उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत.
या पॅनेलच्या शेती संस्था गटाच्या सात जागांसाठी बाजार समितीचे माजी उपसभापती विलास माने व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह मनोहर ढूके, संग्रामसिंह निंबाळकर, रोहित मोहोळकर, दत्तात्रय फडतरे, संदीप पाटील हे उमेदवार आहेत. महिला प्रवर्गासाठी शेतकरी विकास पॅनलकडून रूपाली वाबळे व मंगल झगडे हे उमेदवार असून, इतर मागास प्रवर्गातून तुषार जाधव हे उमेदवार आहेत.
भटक्या विमुक्त प्रवर्गातून आबा गणपत देवकाते, ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेतून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे बंधू मधुकर भरणे व संतोष गायकवाड हे उमेदवार आहेत तर ग्रामपंचायतीच्याच आर्थिक दुर्बल घटकातून शेतकरी विकास पॅनल कडून अनिल बबन बागल हे उमेदवार आहेत. भाऊसाहेब तुकाराम सपकाळ हे या पॅनलचे पॅनलप्रमुख आणि कांतीलाल झगडे हे प्रचारप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे व अशोक घोगरे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे 14 उमेदवार उभे असून या स्वाभिमानी शेतकरी पॅनल मधून कृषी संस्था सर्वसाधारण गटाच्या सात जागांसाठी उल्हास वसंतराव जाचक, तानाजीराव कृष्णराव निंबाळकर, संपत भीमराव सरक, विलास पंढरीनाथ घोळवे, अशोक शंकरराव घोगरे, महारुद्र शिवदास पाटील व सुभाष अर्जुन जगताप हे सात उमेदवार आहेत.
कृषी पतसंस्थेच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे सुप्रिया कैलास कोळेकर व नर्मदा विलास पवार हे उमेदवार असून इतर मागास प्रवर्गासाठी देविदास तात्याबा भोंग, भटक्या विमुक्त प्रवर्गातून बाळासाहेब सोपान चितळकर, ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण दोन जागांसाठी धोंडीबा माणिक थोरात व सुभाष किसन गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून तानाजी नवनाथ नरूटे यांना उमेदवारी दिली आहे.