राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांसाठी २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी १६७ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. त्यामुळे ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ही माहिती दौंड सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी दिली.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक २०२३ निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर २०६ उमेदवारी अर्ज वैध होते. गुरुवारी (दि.२०) दाखल अर्ज माघार घेण्यासाठी दुपारी तीनची वेळ होती. त्यामुळे तब्बल १६७ उमेदवारांनी आपले दाखल अर्ज माघार घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे 39 अर्ज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकारी संस्थेच्या ११, ग्रामपंचायत ४ , व्यापारी २ हमाल १ अशा एकूण १८ जागा आहेत. यासाठी सहकार संस्थेत १ हजार ५६९ मतदार, ग्रामपंचायत ८७६, व्यापारी १८९ व हमाल ३३ असे एकूण २ हजार ६६७ मतदारांची संख्या आहे. या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती दौंड सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी दिली.
दरम्यान दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात माजी आमदार रमेश थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. यंदा या निवडणुकीसाठी दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी आपला पॅनल उभा करून राष्ट्रवादी समोर आव्हान उभे केले आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या समर्थकांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे मागे घेतले आहेत.
त्यामुळे काळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आमदार कुल यांनी राष्ट्रवादी समोर पॅनल उभा करून केलेले आव्हान कितपत यशस्वी ठरते हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र सहकारी संस्थेच्या या निवडणुकीतही आमदार राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.