परिस्थिती विरोधात जरी असली तरी यश मिळवता येते पण फक्त जिद्द असायला हवी हे दाखवून दिले आहे शिरसगावातील तीन ध्येयवेड्या युवकांनी!
शिरूर : महान्यूज लाईव्ह
जिथे सगळ्या सुविधा असतात मात्र तरीही यश मिळत नाही अन् जिथे कुठल्याच सुविधा नाही मात्र तिथे परिस्थितीशी दोन हात करत यश मिळवता येते हे दाखवून दिले आहे शिरसगाव काटा येथील अमोल सोनवणे, संगम धुमाळ या ध्येयवेड्या तरुणांनी तर संगीता सोनवणे यांची यशाची कहाणी वेगळीच आहे.
शिरसगाव काटा येथील अमोल सोनवणे यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात, धुमाळवाडी येथील संगम धुमाळ यांची ठाणे शहर पोलिस दलात तर संगीता सोनवणे यांची महिला पोलीस म्हणून पालघर पोलिस दलात नुकतीच निवड करण्यात आली आहे. मात्र या यशस्वी झालेल्या तिघांची कठोर मेहनत अन् जिद्द वेगळीच आहे.
पालघर पोलिस दलात निवड झालेल्या संगीता सोनवणे यांनी यशाबद्दल बोलताना सांगितले की,सुरुवातीपासून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील अपंग व अशाही खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मांडवगण फराटा येथून घेल्यांनतर शिरूर येथील सी टी बोरा महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर पुणे शहरात आय टी पार्क मध्ये नोकरी केली. सुरुवातीपासून पोलिस दलात जायचे स्वप्न होते. त्यामुळे नोकरी करत असताना पोलिस भरतीचा अभ्यास सुरू केला.सातत्य ठेवले. सहकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.अन् नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत उज्ज्वल यश मिळवत पालघर पोलिस दलात निवड झाली आहे. या यशात आई रखमाबाई वडिल रामदास यांचा मोठा वाटा असल्याचे संगीता सोनवणे यांनी सांगितले. तर मुलीचे यश पाहून आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड झालेल्या अमोल सोनवणे यांनी सांगितले की, बारामती येथे बी ए पर्यंतचे शिक्षण घेतले. खेळाची पूर्वीपासून आवड असल्याने शिकत असताना बारामती येथेच काही युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले. अभ्यासात हुशार असल्याने पोलिस भरतीचे क्षेत्र खुणावू लागले. २०१९ मध्ये पहिला प्रयत्न केला मात्र त्यात दोन गुणांनी यशाला हुलकावणी दिली. त्यांनतर मात्र जिद्द अन् चिकाटी धरत मेहनत घेतली.
गावाकडे आल्यानंतर गावात फारशा सुविधा उपलब्ध नसताना ही व्यायामशाळेत अभ्यास केला. याच बरोबर परिसरातील युवकांना एकत्र येत इथेही मार्गदर्शन केले. सराव व सातत्य ठेवल्याने नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड झाली आहे. एकत्रच अभ्यास करणाऱ्या अमोल सोनवणे ठाणे शहर पोलिस दलात निवड झालेल्या संगम धुमाळ यांनी मित्राने केलेल्या मार्गदर्शनामुळेच पोलिस व्हायचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.
या यशाबद्दल गावातील सरपंच ज्योती संतोष जाधव, कोल्हाटीबुवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कदम, जयदीप पवार, गणेश शिंदे, काशिनाथ काटे, प्रा.सचिन आवारे,आदींनी गुणवंत युवकांचा सत्कार केला. गावातून प्रथमच महिला पोलिस म्हणून संगीता सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल तर दोन मित्रांची एकाच वेळी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.