विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. मात्र या सगळ्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच आता काय स्टँप पेपरवर लिहून देऊ का?असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.
तसेच इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यांचाही समाचार अजित पवार यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, इतर पक्षांचे प्रवक्ते सुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करता त्याबद्दल बोला. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही असेही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,आम्ही सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत. पक्षातच राहणार आहोत, इतर राजकीय पक्षाचे लोक याबद्दल स्वत:ची मतं व्यक्त करत आहेत. त्यांनी खुशाल करावीत. त्यांना तो हक्क आहे. आज मी माझ्या कार्यालयात बसतो, त्यावेळी आमदारांच्या बैठका असतात. मंत्रालयात आलेले आमदार मला भेटायला आले. त्याचा वेगळा अर्थ काढू नका.
ते म्हणाले की, या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही तुम्ही ध चा मा करू नका. मी ट्वीटरवरून वॉलपेपर काढला, त्याचीही बातमी तुम्ही लोक करता? ध चा मा करू नका ना! पक्षाच्या बाहेरचे लोक विघ्नसंतोषी आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. काही पत्रकार तर मला सकाळीही विचारत होते की, तुम्ही जाणार आहात का भाजपात? त्यांना म्हटलं आता काय तुम्हाला स्टँप पेपरवर लिहून देऊ का? की प्रतिज्ञापत्र करून देऊ? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. मात्र या सगळ्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.