विक्रम वरे/सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा हवाच.. धकाधकीच्या जीवनशैलीत चहावाल्याचे महत्व वाढले, तसेही देशातच चहावाल्याचे महत्व वाढले असल्याने चहावाल्यांची सध्या चांगलीच चलती आहे. बारामती इंदापूर रस्त्यावरील सणसर येथील एक इंजिनियर पोरगा चहाचं दुकान रस्त्यावरती थाटतो आणि नंतर त्याला लोकही भरभरून प्रतिसाद देतात, तो मिरवली चहा संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निमित्ताने बेघर बनला.
रस्त्याचं काम सुरू असल्याने दुकान बंद झालं आणि काय करावे असा प्रश्न सणसरच्या धोत्रे बंधूंपुढे पडला, पण त्यांनी त्यातून काढलेली भन्नाट आयडिया अनेकांचे डोळे दिपवणारी ठरली आहे.
इंदापूर बारामती रस्त्यावर संत तुकाराम पालखी महामार्गाचे काम चालू आहे, त्या ठिकाणी “मिरावली” चहाचे दुकान अजित धोत्रे व सुधीर धोत्रे या बंधूंचं होतं. अजित धोत्रे यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे व सुधीर धोत्रे यांचे शिक्षण बी.कॉम. झाले आहे. कोरोनाच्या काळात ते चालवत असलेले एक खाजगी कॅन्टीन बंद झाले आणि त्यांनी चहाचा मार्ग निवडला या चहाला लोकांनी भरभरून पसंती दिली अगदी क्लासवन ऑफिसर पेक्षा जास्त पगार हे दोघेजण या माध्यमातून मिळवत होते.
मात्र इंदापूर बारामती रस्त्यावर पालखी महामार्गात ते दुकान रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर काय करायचे ही चिंता अजित धोत्रे व सुधीर धोत्रे या दोन्ही बंधूंना होती. परंतु त्यांनी हताश न होता त्यावर त्यांनी एक भन्नाट कल्पना शोधून काढली व एक चालत फिरतं दुकान त्यांनी तयार केलं आहे.
त्यालाही नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.व रोज हजार ते बाराशे कप चहा विकला जात आहे. दुकान पालखी महामार्गामध्ये जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आपण अशी चहासाठी गाडी बनवू की ती गाडी कुठेही लावता येईल आणि ती गाडी रोज घरी घेऊन जाता येईल असे अत्यंत सुंदर असे चालते फिरते दुकान त्यांनी बनवले आहे.
अजित व सुधीर यांनी सांगितले की, हॉटेल रस्त्यात गेल्यानंतर आम्ही त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी चालू करण्याचा निर्णय घेतला व चहाची गाडी चालू केली. आता त्याच ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ही चहाची गाडी आम्ही पुण्यामध्ये बनवून घेतली. एक ते दीड ते महिन्यामध्ये ही गाडी आम्हाला बनवून मिळाली.
अशी चहाची गाडी बऱ्याच ठिकाणी पाहिली होती आणि पालखी महामार्गात हॉटेल जाणार होते. हे माहिती असल्यामुळे ही गाडी बनवायचा निर्णय घेतला. ही गाडी बनवण्यासाठी सहा ते साडे सहा लाख रुपये खर्च आला. टेम्पोमध्ये हे दुकान थाटण्यात आले असून यासाठी उत्तम प्रकारचे किचन, फ्रिज, दोनशे वॅट क्षमतेच्या दोन बॅटरी ज्यामधून वीजनिर्मिती होऊ शकेल अशी व्यवस्था यामध्ये असून पाणी वापरण्याची देखील यामध्ये सुविधा करण्यात आली आहे. या पालखी महामार्गाचे काम होईपर्यंत हा सेटअप योग्य ठरेल असे आम्हाला वाटले. असे धोत्रे बंधूंनी महान्यूजशी बोलताना सांगितले.