सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापुरात पहाटे उठून अनेक महिला व पुरुष मॉर्निंग वॉक ला जात असतात. गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकीवरील मद्यपी तरुणाने रस्त्याने जाणा-या महिलांना गाडी आडवी मारण्याचा प्रयत्न केला. आडवातिडवा बराच वेळ हा प्रकार चालू होता.
सजग नागरिकांना ही बाब समजल्यावर ते मद्यधुंद दुचाकीस्वाराची गाडी अडविण्यासाठी रस्त्यावर उभा राहिले, मात्र त्या बहाद्दराने वेगाने गाडी चालवत नागरीकास धडक दिली. यावेळी तो दुचाकीस्वार व नागरीक दोघेही जखमी झाले.
याबाबत नागरिकांनी इंदापूर पोलिसांना हा प्रकार कळवला. मात्र पुढे काही झालेच नाही. दोन महिला तक्रार देण्यास गेल्या मात्र त्यांनी तक्रार केली नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली. अर्थात हा प्रकार घडल्यानंतर नगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची नक्कीच आठवण इंदापूरकरांना झाली. त्याचे कारण असे की, प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी स्वतः तक्रार देणे अपेक्षित नाही. आपल्या नजरेसमोर गुन्हा घडत असताना पोलीस डोळेझाक करत असतील तर त्या कायदा सुव्यवस्थेला काय म्हणावे?
ह्या घटनेविषयी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या सुशिक्षित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१३) इंदापूर ते कालठण नं.2 रस्त्यावर पहाटे पावणे सहाच्या दरम्यान इरिगेशन कॉलनीच्या काही अंतरावर हा सर्व प्रसंग घडला.
नागरिकांनी सांगितले की, सकाळी इंदापूर शहरातील नागरिक या रस्त्याने मॉर्निंग वॉक साठी जात असताना एक तरुण नशेच्या अवस्थेमध्ये रस्त्याने चालणा-या महिलांवर टू व्हीलर घालण्याचा प्रयत्न करत होता. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती वाहन घालून त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार एकाच ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटे चालू होता. दहा ते बारा नागरिक व चार-पाच महिला यामुळे त्रस्त झाल्या. महिलांनी तेथील रस्त्याने व्यायामासाठी निघालेल्या नागरिकांना दुचाकी स्वराच्या कृत्याबद्दल सांगत या प्रकारामुळे आपण घाबरल्याचे संगीतले.
दरम्यान परत परत फिरून येणाऱ्या त्या तरुणास थांबवण्यासाठी निवृत्त सरकारी कर्मचारी बाळू शिंदे यांनी प्रयत्न केला. मात्र त्या मद्यपी दुचाकीस्वाराने शिंदे यांच्या अंगावरच मोटरसायकल घातल्याने शिंदे जखमी झाले. तसेच दुचाकीस्वारही पडल्याने तोही जखमी झाला.
येथील काही नागरिकांनी पोलिसांकडून मदत व्हावी यासाठी आपत्कालीन नंबर 112 वरती संपर्क साधून पोलिसांकडून मदत मागवली. नंतर त्यांच्यापैकी एकाने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन ठाणे अंमलदार वाघ यांना सदर प्रकार सांगितला. मग मोठ्या वाहनातून त्यांनी जाऊन त्यास ताब्यात घेतले.
जखमी झाल्याने त्या दोघांवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान पत्रकारांनी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता नरुटवाडी गावचा हा रोडरोमिओ असून काटी गावातही त्याचे वास्तव्य आहे नरुटवाडी येथे त्याची शेती असल्याचे सांगितले.
याबाबत नागरिकांनी इंदापूर पोलिसांनाही याची खबरही दिली होती. पोलिसांनीही दोन्ही जखमींना त्यांच्या वाहनातून आणले. पण चार दिवस उलटून गेले, तरी त्या मद्यपी दुचाकी स्वारावर काय कारवाई झाली? पुढे काय झाले हे मात्र समजू शकले नाही. या तरुणावर तक्रार देण्यासाठी यातील दोन महिला शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी तक्रारीबाबत चौकशी केली असता त्यांनी लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगितले.
अर्थात काल सायंकाळी पत्रकारांनी या प्रकरणाची सहजच चौकशी केली आणि तक्रार नसल्याचे समजल्याने निघून गेल्यावर पोलीसांनी त्या तरुणास स्टेशनला आणल्याचे समजते. या प्रकारानंतर कर्जत मधील पोलिसांची देखील आठवण झाली. कर्जत मध्ये एका दारुड्याने राक्षसवाडी या गावांमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणांमध्ये दखल घेऊन पोलीस कर्मचारी स्वतः फिर्यादी होऊन त्या दारुड्यास पंधरा दिवसाची तुरुंग वारी घडवून आणली. इंदापुरातील महिला सुरक्षित नाहीत, यामागचं कारण काय तर नागरिक एव्हाना समजून चुकले असतील.