दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या पश्चिम भागात जोर खोऱ्यातील चिखली गावच्या परिसरात १७ एप्रिल रोजी ढगफूटीसारखा पाऊस झाला या तुफान पावसाने गावातील अनेक घरांचे तर नुकसान केलेच परंतु 70 ते 75 एकर जमीन या पावसामुळे नुकसानग्रस्त झाली.
येथील ओढ्यानाल्यांना महापूर आला, तर अनेक ठिकाणी ओढ्याचे पाणी शेतात घुसल्याने उभी पिके वाहून गेली होती. काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या. अचानक झालेल्या या आपत्तीने येथील अनेक शेतकरी रडवेले झाले होते. या पावसामुळे नागेवाडी येथील वसंत सावळा जाधव या शेतकऱ्याची
५० हजार रुपये किमतीची म्हैस ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने या गावात दुसऱ्या दिवशी धाव घेतली. वाईच्या तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, उपसभापती भैय्या डोंगरे, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गोंजारी, वाई तालुका कृषी अधिकारी पी. बी. शेंडे. मंडल कृषी अधिकारी विजय गायकवाड, विस्तार अधिकारी व्ही. व्ही. बाबर, कृषी पर्यवेक्षक सोमनाथ पवार, कृषी सहाय्यक शंभूराज तुपे, मंडलाधिकारी राजेंद्र बेलोशे, तलाठी भुषण रुकडे, ग्रामसेवक के.डी .चव्हाण आदींनी घटनास्थळी दाखल होऊन नुकसानीची पाहणी केली.
सरपंच जयश्री मोजर, उपसरपंच मारुती वाडकर यांच्यासह ग्रामस्थांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागातील शेतजमीनींची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली. येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण होऊन नुकसानीचा अंदाज येईल असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाईचे कृषी अधिकारी पी.बी.शेंडे यांनी दिलेली माहिती अशी की
ढगफुटीने चिखली मध्ये पडलेल्या मुसळधार पावसा मुळे गावातील शेतकऱ्यांच्या ५ ० एकर शेत जमीनी वरील मोठ मोठाल्या ताला बांध शेतातील मातीसह वाहुन गेले आहे. तर २५ एकर शेतामधील ज्वारी गहु पावटा भुईमूग आणी कांदा हि पिके वाहुन गेली आहेत .त्याची पाहणी करुन नुकसान ग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वरीष्ठांना तसा अहवाल तयार करुन तातडीने पाठवला आहे . ते पुढे म्हणाले दि.१४ ते १६ या दोन दिवसात चिखली वरखडवाडी .एकसर .कुसगाव. विठ्ठलवाडी .पसरणी. बोरगाव .वयगाव .दह्याट .नागेवाडी.
याही गावांन मध्ये मोठे नुकसान झाले आहे .या नुकसान ग्रस्त गावांची नोंद कृषी विभागाने घेतली आहे असेही शेंडेसाहेब म्हणाले .
चौकट ….ज्या शेतकर्यांची शेतजमीन नदी ओढे नाले यांच्या शेजारी आहेत अशा शेतकर्यांनी त्यात अतिक्रमणे करु नयेत .अतिक्रमणा मुळे ओढे नाले नदी यांचे पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात तेच पाणी आपल्या शेतात घुसते आणी आपली पिकांन सह शेतजमीन वाहुन जाते .
पी.बी.शेंडे .
तालुका कृषी अधिकारी वाई .