प्रमोद चौगुले यांच्या यशाबद्दल सोनी येथे हत्तीवरून साखर वाटप..!
युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
सोनी तालुका मिरज येथील प्रमोद चौगुले यांनी एम पी एस सी मध्ये महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने प्रमोद चौगुले यांची हत्तीवरून मिरवणूक व साखर वाटप केले.
प्रमोद चौगुले हे सोनी गावचे सुपुत्र आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेत, सोनी येथेच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. वडील टेम्पो चालक व आई शिवणकाम करत होत्या. सर्वसामान्य कुटुंबातून महाराष्ट्रामध्ये एमपीएससीत अव्वल आल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आजचा युवक एमपीएससी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतो, बऱ्याच व्यक्तींना ही परीक्षा एकदा उत्तीर्ण होणे देखील आव्हानात्मक असते. प्रमोद चौगुले यांनी सलग दोन वेळा प्रथम येण्याचा विक्रम केला आहे. हे सोनीकरांसाठी अभिमानास्पद आहे.
हा कौतुकोत्सव भरघोस यशाप्रमाणे भव्य दिव्य होणे गरजेचे होते. म्हणून गावकऱ्यांच्या वतीने हत्तीवरून मिरवणूक काढण्याची व साखर वाटप करण्याची संकल्पना सुचली व आज ती पूर्णत्वास आणली. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. असे मत सोनी गावचे सुपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी व्यक्त केले.
पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिला आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने अशीच भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचवेळी मी देत असलेल्या दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू होती. गावकऱ्यांनी केलेला भव्य दिव्य सत्कार हा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आणि त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात देखील महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवता आला. इतर ठिकाणी होणारे सत्कार व आपल्या गावात होणारा सत्कार हा नक्कीच वेगळेपण जपणारा असतो. आपल्या व्यक्तींनी आपले केलेलं कौतुक हे आयुष्य समृद्ध करणारे असते. माझ्याबरोबर इतरही युवकांनी यश मिळवण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आता माझी आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
या निमित्ताने आदित्य चव्हाण, सयाजी पाटील, हरिभाऊ पाटील, प्रा. डॉ.नंदकुमार पाटील, जयसिंग चव्हाण, महादेव चौगुले, सुलोचना पाटील, शाहीर देवानंद माळी, तेजल माळी, चारुदत्त पाटील, प्रफुल्ल ढोबळे, पूजा चौगुले, डॉ. साहिल नदाफ, एस. एस. कोळी आदी मान्यवरांचा विविध क्षेत्रातील यशाबद्दल प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच शारदा यादव, उपसरपंच सुरेश मुळीक, सोनी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. उल्हास माळकर तसेच ग्रामपंचायत व विकास सोसायटीचे सर्व आणि माजी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश जाधव यांनी केले. माजी उपसरपंच श्यामजी ढोबळे यांनी उपस्थितांचे आमचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, अरविंद पाटील, डॉ. विनायक माने, संजय माने, विक्रम ढोबळे, प्रयास यादव, दिनकर पाटील फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले.