संपादकीय
महाराष्ट्र राज्याचा सन 2022 मधील महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार काल आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. देशाच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री व आमदार उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी सकाळपासून या कार्यक्रमासाठी आले होते. आपल्या गुरुला हा सन्मान मिळणे हा प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण असतो, हे मान्य! परंतु थोडी तरी विवेक बुद्धी पाहिजे! ही विवेक बुद्धी हा कार्यक्रम उन्हात ठेवणाऱ्यांच्या नियोजनाला देखील पाहिजे आणि या कार्यक्रमासाठी सदस्यांना या म्हणून सांगणाऱ्यांना देखील पाहिजे!
फक्त भक्तीच्या नावाखाली आपली ताकद दाखवणाऱ्या प्रत्येक धर्माच्या पोशिंद्याला, हा भोळा समाज आहे, त्याची किती सहनशक्ती पहावी याची देखील सदसद्विवेकबुद्धी पाहिजे. बाबांनो, एक नव्हे, दोन नव्हे तब्बल अकरा जणांचा जीव गेला आहे. ज्यांच्या घर घरातील कर्ता पुरुष गेला आहे त्याची भरपाई पाच लाखांनी होईल? बरं, ज्यांचा मृत्यू झाला त्यांची मोजदाद करता येईल, मात्र ज्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला, डीहायड्रेशन मुळे त्यांना अनेक व्याधींना येत्या काळात सामोरे जावे लागेल अशांच्या त्रासाला जबाबदार कोण?
आणखी एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे सत्तेतल्या लोकांना प्रश्न विचारायचे नसतात. एवढी मोठी घटना घडल्यानंतर एरवी जे उसळून बोलतात असे कोणीही उसळून बोलताना दिसले नाही. उलट ही घटना झाकायची कशी? ही कशी नैसर्गिक आपत्ती आहे? हेच सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करताना अनेकजण दिसत होते. अर्थात हीच घटना जर विरोधक असलेल्या सरकारच्या काळात घडली असती तर? दूर कशाला काँग्रेसच्याच सत्तेच्या काळात घडले असती तर? किती मोठा आकांडतांडव केला असता? त्या राजाच्या मुख्यमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, असं म्हणून दिवसभर टिवटिव केली असती?
फार झटपट वेळेत लोकशाहीचा चौथा स्तंभ रसातळाला गेला याचा देखील दुर्दैव आहे. कारण या घटनेला जबाबदार कोण? असा एकही प्रश्न वृत्तवाहिन्यांनी अथवा वृत्तपत्रांच्या संपादकांनी विचारला नाही. एवढी दातखिळी का बसली आहे? सरकारची डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारणाऱ्या या पत्रकारितेच्या इतिहासाला काळीमा फासला गेला होताच, पण आता तर त्याची काहीच किंमतही उरलेली नाही. कारण प्रसारमाध्यमांची विवेकबुद्धी भांडवलशाहानी गहाण ठेवली आहे. निवडणुकीच्या पॅकेज पुरती वृत्तपत्रांची किंमत उरलेली आहे.
कदाचित वृत्तपत्रांना आणि वृत्तवाहिन्यांना असा प्रश्न पडला असेल की, ज्यांचे लाखो सदस्य अनुयायी आहेत अशांना प्रश्न विचारला तर किती गहजब होईल? कारण हे हिंदुराष्ट्र आहे आणि जर सरकारला विचारला, तर येणाऱ्या निवडणुकीत पॅकेज कोण देणार? तसंही आता निवडणुकांच्या पॅकेजला ही काही किंमत उरलेली नाही, कारण जशा घटना घडतात, त्यावरून वृत्तांकन करायचे आणि एखादा नेता नेमके काय बोलला त्यावरून ज्या पक्षाला फायदा होईल त्याचे लाईव्ह करायचे, डिबेट करायचे यावरती आता पॅकेज ठरू लागले आहे.
त्यामुळे साहजिकच त्यांची दातखिळी ही अनपेक्षित नाही, परंतु किमान एक सदसद्विवेकबुद्धी प्रसारमाध्यमांना असायलाच हवी होती की, ज्या सरकारने हा कार्यक्रम ठेवला, त्यांना उन्हाळ्याच्या तीव्रतेची पूर्ण कल्पना होती, तरीदेखील त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. मग त्यांच्या विरोधात अवाक्षर काढायचे नसेल, तर त्यांची तळी तरी का उचलायची? याउलट दवाखान्यात दाखल केलेल्या श्री सदस्यांना पाहण्यासाठी मुख्यमंत्री कसे गेले याचे प्रक्षेपण वृत्तवाहिन्या दिवसभर करत राहिल्या.
प्रचंड गर्दीमुळे काहीही घडू शकते, याची आता सर्व अनेक बाजूंनी सारवासारव केली जाईल, परंतु ज्या सांप्रदायातील हे सर्व लोक आहेत, त्या सांप्रदायाच्या प्रमुखांना देखील या पुरस्कारासाठी गर्दी टाळता आली असती, पण कदाचित अप्रत्यक्ष हे शक्तिप्रदर्शनच असावे इतकी शंका येण्याइतपत हे सर्व घडले आहे. उत्तर प्रदेशातल्या एखाद्या सवंग लोकप्रियता दाखवणाऱ्या अध्यात्मिक किंवा भोंदू बाबाला अशा प्रकारच्या गर्दीची गरज भासत असावी, पण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, पुढारलेल्या राज्यात सुद्धा एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीला अशा प्रकारच्या शक्तीप्रदर्शनाची गरज का पडली? हा विचार करावा लागेल.
कदाचित एखाद्याकडे खूप मोठा अनुयायांचा वर्ग आहे, म्हणून हा पुरस्कार दिला गेला का? अशी शंका, जी कुजबुज व्यक्त केली जात होती, त्याला अगदी समर्पक अशी ही घटना घडली आहे. या महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकोबारायांचा विचारांचा प्रचंड मोठा वारसा आहे. अशा वारसा असलेल्या राज्यात आपण प्रसिद्धीपराॾमुख असल्याचे भासवून प्रत्यक्ष मात्र प्रसिद्धीचेच धनी आहोत, हे दाखवून देणारा संप्रदायाचा प्रमुख काल महाराष्ट्राने पाहिला आणि म्हणूनच हा महाराष्ट्रभूषण की महाराष्ट्र भीषण अशा प्रकारचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
कदाचित कोणी बोट दाखवणार नाही, प्रश्न विचारणार नाही पण अनेकांच्या मनात काल जी भावना आली ती कोणीही विसरणार नाही ज्याने उपदेश करायचा, त्यांचेच पदर भोंगळे आहेत. आणि जर आध्यात्मिक ताकद असेल तर त्या लोकांना का त्रास झाला? याचा देखील मनातला उमटणारा प्रश्न महाराष्ट्राची जनता नक्कीच ठेवेल.