शिरूर : महान्यूज लाईव्ह
पाठीशी भाऊ नसला तरी आई-वडिलांना मात्र आपणच मुलगा व अधिकारी होऊन दाखवायचे आणि घरातील मुलाची कमतरता भरून काढायची असं तिने लहानपणी ठरवलं.. मग तिने पोलीस भरतीचा पर्याय निवडला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार वेळा ती अपयशी ठरली; पण तिची जिद्द एवढी अभंग होती.. चिकाटी एवढी जोरदार होती की, अपयशाला देखील तिच्या पुढे हार मानावी लागली..जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील माधुरी मारुती खोमणे हीने पोलीस शिपाई पदावर नाव कोरले आहे.
मांडवगण फराटा येथील माधुरी खोमणे हीची पोलिस दलात निवड झाल्यानंतर नुकतेच तिने यशाचे रहस्य उलगडले. यावेळी बोलताना माधुरीने सांगितले की, लहानपणापासून पोलिस दलात जायचे स्वप्न होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गावातील माध्यमिक शाळेत १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फराटे पाटील महाविद्यालयात बी. ए चे शिक्षण घेतले. दरम्यान शिक्षण घेत असतानाच गावातच दररोज स्पर्धा परीक्षेचा सराव सुरू ठेवला. दररोज दहा ते बारा तास अभ्यास केला. गावात मैदानी सराव करत असताना एकटीने १५ किलोमीटर धावण्याचा व ३५०० दोरीवरील उड्या असा सराव केला.
सन २०१४ पासून सातत्याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले. चार वेळा अपयश आले. कित्येकदा काही सेकंदावर संधी हुकली, मात्र अपयशाने खचून न जाता अभ्यासात सातत्याने ठेवल्याने अखेर यावर्षी पोलिस दलात जायचे स्वप्न पूर्ण झाले.
या यशात आई छाया व वडील मारुती खोमणे यांसह चुलतभाऊ शेखर खोमणे, प्रा. शंकर काळे, प्रमोद भंडलकर, संदेश भंडलकार आदींचा वाटा असल्याचे तिने सांगितले. आम्ही तीन बहिणी असून आम्हाला भाऊ नसल्याने आई वडील सतत पोलिस भरतीचे वेड सोडून दे असे सांगत होते, मात्र अधिकारीच व्हायचे असे ठरवले होते. घरच्यांनी या जिद्दीला मनापासून पाठबळ दिले. माझ्या घरात मुलगा व मुलगी हे भेदभाव नाही हे सिद्ध तर झालेच होते, पण आता आई वडिलांचे स्वप्नही पूर्ण केल्याचे समाधान आहे. पुढे पोलिस उपनिरीक्षक व्हायचे असल्याचे माधुरी हिने सांगितले.