राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड: भारतीय राज्यघटनेचे, शिल्पकार, कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार, समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती दौंड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या जल्लोषात साजरी झाली.
दौंड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करून भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे चित्र रेखाटले होते. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चौकात भीम अनुयायांनी गर्दी केली होती.
बारा वाजुन पाच मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली यावेळी. बुद्ध वंदना पूजा करण्यात आली. १४ एप्रिल रोजी शहरात विविध संघटनांनी अनेक उपक्रम राबवत बाबासाहेबांना अभिवादन केले. रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आली.
या मिरवणुकीत सर्व जातीधर्मातील नागरिक सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक व महिला व भिम अनुयायांनी चौक गर्दीने फुलून गेला होता. भव्य आकर्षक अशी साऊंड सिस्टीम डिजेवर मिरवणूक काढत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांवर नाचून जल्लोष साजरी केला.
मिरवणूक व जल्लोषात निळे, भगवे, हिरवे रंगाचे झेंडे हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासूनच दौंड शहरात पुस्तके खरेदी, निळे झेंडे,फेटे खरेदी करण्यासाठी गर्दी होत होती. अनेक सामाजिक संघटनांनी समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून जयंती साजरी केली.
पाटस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अशोक स्तंभाचे उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. राहुल युवक मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विद्युत रोषणाईने व फुलांनी सजावट केलेल्या घोड्यांच्या रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यंदा या मिरवणुकीत मुस्लिम समाज बांधवही मोठ्या संख्येने हातात हिरवे झेंडे घेऊन सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कुरकुंभ, वरवंड, मलठण, राजेगाव, नानगाव, केडगाव, पारगाव, कुसेगाव, खडकी, मळद, देऊळगावराजे आदी गावांमध्येही जल्लोषात जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.