दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – तालुक्यातील सुरूर गावच्या यात्रेतील तमाशात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसमोरच गोंधळ घालून हाणामारी केल्याबद्दल पोलिसांनी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या. भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १३ एप्रिल रोजी सुरुर (ता. वाई) येथे वार्षिक यात्रेसाठी यात्रा कमिटीमार्फत तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तो पाहण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी गावात झाली होती.
तमाशा ऐन रंगात आला असतानाच दोघांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळाचे रुपांतर हाणामारीत झाले. तसेही तमाशाच्या वेळी थोडा गोंधळ देखील तमाशा बंद पाडण्यासाठी पुरेसा ठरतो. येथे मात्र दोघांनी सुरू केलेला गोंधळ पोलिसांसमोरच सुरू होता.
मग पोलिसांनी तातडीने विजय चव्हाण व लक्ष्मण चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले व भुईंज पोलिस ठाण्यात आणले. महिला पोलिस कॉन्स्टेबल रुपाली शिंदे यांनी तक्रार दाखल करुन वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा अधिक तपास भुईंज पोलिस करीत आहेत.