राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील शहरासह तालुक्याच्या पूर्व भाग व इतर भागात काल रात्री विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने झोडपले तर दौंड शहरातील स्वामी समर्थनगर भागात वीज पडल्याने बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
दौंड शहर, तालुक्यातील पाटस, कुरकुंभ, मळद यासह दौंडच्या पूर्व भागात गुरुवारी (दि १३) रात्री साडेसहा सातच्या आसपास विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने सुरुवात केली. परिणामी शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला कांदा, फळबागा व पालेभाज्यां व इतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
तसेच दौंड शहरातील समर्थनगर येथील लिंगाळी चे माजी सरपंच गणेश जगदाळे यांच्या घरासमोर वीज पडल्याने घरासमोर उभ्या असलेल्या बैलगाडीने पेट घेतला. काही क्षणात आगीचा आगडोंब हवेत पसरला. त्यामुळे या आगीत शेजारी असलेल्या ट्रॅक्टरलाही या आगीची झळ पोहचली.
यामध्ये बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील काही भागातील वीज पुरवठा रात्री खंडित झाला होता.