शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाचे योगदान असलेल्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राजू मोमीन यांची थेट दखल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनाही घ्यावी लागली.त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन मोमीन यांचा नुकताच गौरव करण्यात आला.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखा म्हणजेच नेहमी मोठ्या आव्हानांचा सामना करत गुन्ह्याचा तपास करणारी शाखा.जिल्ह्यातील दरोडे, खून असो की अन्य गंभीर गुन्हे, यामध्ये पोलिस हवालदार राजू मोमीन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे अनेक आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
पारगाव (ता.दौंड) येथे काही दिवसांपूर्वी सात व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. राज्याला हादरा देणाऱ्या या घटनेत प्रथमदर्शनी सामूहिक आत्महत्या प्रकरण वाटत असतानाच पुणे ग्रामीण पोलिसांनी कसोशीने तपास करत सात जणांचे हत्याकांड उघडकीस आणले. तसेच घटनेतील पुरावे ही जमा केले. या प्रकरणातील आरोपींना अटक केल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र मोठे कौतुक करण्यात आले होते.
या घटनेतील तपासात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, विजय कांचन, धीरज जाधव, मंगेश थिगळे यांच्यासह इतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची भूमिका बजावली.
पारगाव येथील सामूहिक हत्याप्रकरणात पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह पोलिस हवालदार राजू मोमीन यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रशस्तीपत्रक देऊन नुकताच गौरव केला आहे. यावेळी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदी उपस्थित होते.