नानाची टांग – सुरेश मिसाळ, इंदापूर.
(जगदिश खेबुडकरांची माफी मागून..)
अरं हे गाव लय न्यारं.. तिथं कोटी-कोटीच्या निधीचं वारं.. त्याला टिकाच कसली सोसंना.. कसला भाटगिरीचा ह्यो पारा..साहेब सांगा जरा ठेकेदारा.. लोकांना काही समजंना..
अरं कोटी कोटीचा हिशोब नको रं.. नको फुकटचा छदाम रं..
नाटक्यांचा रं बाजार हिथला.. चोर-सावांची आळिमिळी.. टक्केवारी वर.. सिमेंट- खडी.. गावात ऐट अन आफिसाच्या वारी.. अरं रं..रं..रं..रं..
अरं.. माहिती अधिकाराच्या कागदा.. तू लय मारतुया गमजा.. किती देऊ तुला गप्प कराया.. तू हायेस तरी कोण? ऐका.. तर मग..
जिथे विकास तिथे भ्रष्टाचार.. अशी नवी म्हण गेल्या काही दशकांत जी रुढ झाली होती, त्याला नवा मुलामा देण्याचं काम गावागावात सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव- भावडीचा रस्ता काल-परवा गावकऱ्यांनी अडवला.. आता हा रस्ता का अडवला? तर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, गावकारभारी काय लक्ष देईनात.. मग आम्हाला काही गप्प बसवंना..
त्या लोकांना का गप्प बसवंना? असा प्रश्न विचारल्यावर एक मोठे थोराड खोड बोलून गेले.. रस्ता ७ कोटीचा.. अन एका दिवसात दीड किलोमीटर एवढं अंतर होतंय… पाठीमागच्याच डांबरी सडकेवर थेट डांबार आणि खडी टाकतेत.. थोडी चर.. टॅकींग म्हणं म्हणत्यात त्याला..ते तरी करायचं का नाय? काहीच नाही.. ठेकेदाराच्या माणसांस्नी विचारलं तर ते म्हणतेत की, टेंडरमध्ये त्याची प्रोव्हिजन नाही..
दुसरा एक बोलून गेला.. भाऊ गावातनं सिमेंटचा रस्ता केलाय.. गावात आल्याबरोबर भावडीला, शिंदे मळ्यात जायचं असेल… तर अगोदर हनुमानाचा फोटू काढायचा.. मग उदबत्ती लावायची.. मांडी घालून बसायचं.. पूजा करायची.. हनुमान चालिसा म्हणायचं.. गाडीचं शॉकाब्जर बघायचं.. मोठा श्वास घ्यायचा.. अन सिमेंटच्या रस्त्यावरनं उडी मारायची.. एक-दीड फूट उंच करून ठेवलाय सिमेंटचा रस्ता.. त्याला स्लोप-बिप काय असतो का नाय? काम एवढी दिवस झालं, अजून किती दिवस लोकांनी या रस्त्यानं उड्या मारत जायचं? मणकं खराब व्हायची वेळ आली की राव..!
तेवढ्यात बारक्या बोलला.. रस्त्याच्या कडेची साईडपट्टी जाऊ द्या.. डांबरीच्या कडेला पण डांबरी रस्ता करायचाय.. तर थोडी खडी आणि मातीच मिसळून त्यावर पाणी मारून लगेच त्याच्यावर डांबरी खडीचा थर पसरलाय..
तिसरा म्हणाला.. आम्ही बोंबालतूय की, आम्हाला इस्टीमेट दावा… तर सायेब म्हणतो, इकडं या.. ठेकेदाराची माणसं म्हणत्यात इस्टीमेट नुसारच काम चालू आहे..! अवं घरं आम्हीबी बांधल्यात. साधी साधी गोष्ट बी लक्षात येत नाही व्हयं..! साईडपट्टी करायच्या नादात समदं डांबार पूलाच्या खाली गेलंय..!
चौथा बोलला.. ह्ये जाऊ द्या.. बारामती खानोट्याच्या रस्त्याचं काम २०० कोटीचं हाय.. तिथलं रस्त्याचं काम कसंय ते समद्यांना माहित्ये.. तेबी जाऊ द्या.. साहेबलोकं किती चाबरी झाल्यात बघा.. माहिती अधिकारात या रस्त्याच्या झाडांची माहिती मागितली.. तर इंदापूरातील लामजेवाडी ते खानोटा एवढ्या रस्त्यात फकस्त २२८ झाडं हायेत अशी माहिती आली.. त्यातबी चिंचेची ८ आणि वडाची ७ झाडं हायेत असं लिहून दिलं.. मग मी फकस्त भिगवण भागात मोजली, तर ३२५ झाडं भरली..
त्याच्यावर पाचवा बोलला.. अरं नगा रं खाऊ.. गोरगरीबाचं.. लय तळतळाट लागंल… सगळी येडीबागडी रं.. तुमच्या घरात जन्माला येत्याल.. अजिबात पैसा लाभायचा नाय रं.. कर्माचा सिध्दांत आहे बाबांनो.. भगवान कृष्णानं सांगितलेला.. नका रं फुकटचं खाऊ…!