विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
गावची यात्रा अन् कारभारी सतरा अशी म्हण प्रचलित आहे. सध्या ग्रामीण भागात यात्रा,जत्रा सुरू आहेत. यात्रेमध्ये गाव कारभाऱ्यांची संख्याही अधिक पाहायला मिळते. यात्रेत मानापमानाचा खेळ रंगतच असतो. हाच मानापमान कमी करण्यासाठी काही गावे यावर उतारा शोधत असतात.. बारामती तालुक्यातील एका गावातील व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून या गावात तमाशासाठी लागलेली बोली सव्वा लाखापर्यंत पोचली.. अर्थात ही बोली म्हणजे तमाशा आणण्यासाठी नव्हे, तर ती बोली बोलणाऱ्याला फक्त या तमाशाचा नारळ फोडण्याचा मान मिळण्यासाठी होती..
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
एप्रिल महिन्यात गावोगावच्या यात्रा सुरू होतात. यात्रेचा उत्सव गावकऱ्यांसाठी एक आनंदाचा सोहळाच असतो. या यात्रेमध्ये गावोगावी वेगवेगळे कार्यक्रम असतात. कुस्त्याचा फड,बैलगाडी शर्यत, तमाशा, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतात. गावातील सार्वजनिक समारंभ असो की गावची जत्रा,यात्रा असो अशा कार्यक्रमाध्ये मानापानासाठी आजही अनेकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते.
बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे जो सर्वाधिक बोली लावेल, तो तमाशाचा नारळ फोडेल अशी प्रथा गावकऱ्यांनी पाडली. मग तमाशाचा नारळ फोडण्याचा मान मिळवण्यासाठी चक्क लिलाव सुरू झाला.यंदाही कऱ्हावागज येथे ग्रामदैवत भैरवनाथाची वार्षिक यात्राेच्या नियोजनाची बैठक झाली. या बैठकीत यात्रेनिमित्त करमणूक म्हणून ग्रामस्थांच्या मदतीने लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्याचा निर्णय गावकारभाऱ्यांनी जाहीर केला. मग लिलाव सुरू झाला. १५, २०, ३०, ७५ हजारांवरून लिलावाची बोली सुरू झाली. गावातील राजेंद्र नाळे यांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची बोली लावत रात्रीच्या तमाशाचा नारळ फोडण्याचा मान मिळवला.
हा झाला रात्रीच्या वेळी होणाऱ्या मुख्य तमाशाचा लिलाव.. मग दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या बारीच्या तमाशाचा नारळ फोडण्यासाठीही लिलाव झाला. यामध्ये नवनाथ वायाळ यांनी तब्बल ५५ हजार रुपयांची बोली लावली आहे.प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात तमाशाचा नारळ फोडण्यासाठी बोली लागल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.