बारामती – महान्यूज लाईव्ह
राज्यातील महसूल खात्यांतर्गत उपजिल्हाधिकारी पदाच्या बदल्यांचे पडघम वाजू लागले असून आज महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बारामती व दौंडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित केल्या आहेत. त्यानुसार बारामतीच्या प्रांताधिकारी पदी करवीरचे विद्यमान प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती होणार आहे, तर दौंडच्या प्रांताधिकारीपदी मुल्ला यांची नियुक्ती होणार आहे.
बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व दौंडचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या बदल्या प्रस्तावित असून त्यांच्या रिक्त जागी वरील दोन अधिकारी येणार आहेत. तर दुसरीकडे यापूर्वी बारामतीत पदभार भूषवलेले सध्याचे मिरजचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे हे पन्हाळ्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा पदभार स्विकारतील.
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या संतोषकुमार देशमुख यांची सोलापूरच्या भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदी तर विजयसिंह पाटील यांची सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती होणार आहे.
११ एप्रिल रोजी राज्याच्या महसूल खात्याने काढलेल्या या परिपत्रकात फक्त ६ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे, अर्थात ४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित असल्या, तरी त्यांच्या नियुक्त्या कोठे होणार आहेत, याची मात्र अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा आदेश लक्षात घेता दादासाहेब कांबळे, पुण्याच्या सहायक आयुक्त मंजिरी मनोलकर, प्रमोद गायकवाड, मौसमी चौगुले-बर्डे यांना नव्या आदेशापर्यंत नियुक्त्यांच्या प्रतिक्षेतच राहावे लागेल अशी चिन्हे आहेत. दरम्यान दादासाहेब कांबळे यांनी आज रात्री उशीरापर्यंत बदल्याचे आदेश होतील अशी माहिती दिली.