शिरूर : महान्यूज लाईव्ह
सन 2020 मध्ये तुषार आणि भाग्यश्रीचं लग्न लागलं.. लग्नावेळी दोघांनीही पोलीसच व्हायचं असं ठरवून टाकलं.. एकमेकांच्या स्वप्नपूर्तीसाठी एकमेकांनी एकमेकांना साथ दिली.. सासरच्यांनी भाग्यश्री ही सून नव्हे तर मुलगी समजून तिच्या स्वप्नाला पाठबळाचे पंख दिले.. अन आज चक्क कांदा काढत असतानाच दोघेही पोलीस झाल्याचा मेसेज मिळाला आणि आनंदाला उधाण आले..
शिरूर तालुक्यातील जांबुत पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीतील तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार हे पती-पत्नी एकाच वेळी पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्याच्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेतील महाराष्ट्रातील हे एक आश्चर्य असून, एकाच कुटुंबातील नवरा बायको पोलीस भरती झाले आहेत. स्थळ : चांडोह तालुका शिरूर.. कुसुम शेलार यांनी गावचं सरपंच पद पाच वर्ष भूषवले.. शेती आणि मातीत रमणारं हे म्हातारबा शेलार यांचे कुटुंब.. या कुटुंबातील तुषारला पोलीस व्हायचे वेध लागले आणि त्याचदरम्यान त्याचे सन 2020 मध्ये लग्न देखील झाले, पण लग्न होतानाच तुषार आणि भाग्यश्री यांनी करिअरच्या वाटा ठरवून घेतल्या होत्या.
एकीकडे व्यायाम पोलीस भरतीची तयारी आणि दुसरीकडे शेतातील काम अशी तिहेरी कसरत या दोघांनीही केली. मात्र आपल्या करिअरच्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल, ते करण्याची तयारी त्यांची असल्यामुळे त्यांनी हा सर्व त्रास सहन करत यशाला गवसणी घातली. आज त्यांच्या यशाकडे बघून आई-वडिलांचे देखील डोळे पाणावले होते.