दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त राहुल युवक मंडळाच्या वतीने १२ ते १४ एप्रिल दरम्यान संगीत खुर्ची, लहान मुलांचे खेळ, वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती राहुल युवक मंडळाच्या वतीने देण्यात आली. बुधवारी (दिनांक १२ ) सायंकाळी ५ ते ६ संगीत खुर्ची (सर्व वयोगट महिला व पुरुष ), ६ ते ६.४५ बाटली किल्प चॅंलेज (वयोगट १० ते १८), ६.४५ ते ७.३० मटका फोड (वयोगट १० ते १८ ), ७.३०ते ८.१५ लहान मुलांचे खेळ (वयोगट १० ते १८ ) तसेच गुरुवारी (दिनांक १३) सायंकाळी ५ ते ६ , वयोगट इयत्ता ५ वी ते ७ वी या विद्यार्थ्यांसाठी मासाहेब जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर , माता रमाबाई आंबेडकर तसेच इयत्ता ८वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहीदास महाराज, राजश्री शाहू महाराज,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक,लहुजी वस्ताद साळवे. या महापुरुषांच्या समाज कार्य व विचारांवर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ ते ७ दरम्यान इंग्रजीमधून भारतीय संविधानाचे वाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे, तसेच इयत्ता ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ७ ते ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी भारत देश काल आज आणि उद्या, संविधान संरक्षण करणे काळाची गरज, बहुजन नायक राजश्री शाहू महाराज या महापुरुषांच्या विषयांवर पंचशील नगर येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व विजेता स्पर्धकांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. १४ ) सकाळी ९ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजी उपसरपंच राजेश सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
सकाळी ९.३० वाजता पंचशील नगर येथील समाज मंदिरासमोर पंचशील ध्वजाचा माजी सरपंच व विद्यमान सदस्या आशाताई सुधीर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ९.४५ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे.
या वेळी व्याख्याते डॉक्टर दत्तात्रय जगताप यांचा प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर विजेता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचे वाटप करण्यात येणार आहे, तर सायंकाळी ६ वा. डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी, मर्दानी खेळ, लाठी काठी फिरवणे, दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती राहुल युवक मंडळाच्या वतीने देण्यात आली.