दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या बदलीनंतर पाटस परिसरात अवैध धंदे जोमात सुरू झाले आहेत. हे अवैध धंदे पोलीसांनी त्वरित बंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांची काही दिवसांपूर्वी अंतर्गत बदली करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पाटस परिसरात पत्ते जुगाराचे अड्डे वाढले आहेत. सिमेंट कंपनीच्या आवारात बेकायदा देशी – विदेशी दारूचे धंद्यांची दुकाने सुरू झाली आहेत, तसेच डोंगरेश्वरनगर, भानोबानगर व काही भागात गावठी हातभट्टी दारूची विक्री केली जात आहे.
पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील गावांमध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच किरकोळ कारणावरून मद्यपान करून तरुणांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडत आहेत. या सर्व प्रकारावर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून पाटस परिसरातील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी होत आहे.