सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
चार दिवसातच निरा डावा कालवा इंदापूर तालुक्यातील सणसर मधील रायतेमळा भागात पुन्हा फुटला आहे. आज पहाटे हा कालवा पुन्हा फुटला. फुटलेल्या ठिकाणी पाटबंधारे खात्याकडून कामकाज सुरू होणार होते, त्यासाठी काही अंतरावर पाठीमागे बांधण्यात आला होता. मात्र हा बांधच फुटल्याने पुन्हा पाणी या भागातून शेतकऱ्यांच्या रानात पोहोचले आहे.
कालवा फुटला..याचा व्हिडिओ येथे पहा
पंधरा दिवसांपूर्वीच सणसर येथील या मोरी मध्ये दगड निखळून निरा डावा कालवा फुटला होता. यातून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर पंधरा दिवसही उलटत नाहीत, तोच दुरुस्ती केलेल्या ठिकाणीच पुन्हा घळ पडली आणि आणि नुकसान झाले त्या घटनेला चार दिवस होत नाहीत तोच पुन्हा हा कालवा फुटल्याने रस्त्यावर पाणी पुन्हा भरून वाहू लागले आहे.
या कालव्याची ही मोरी सध्या जलसंपदा विभागाची देखील डोकेदुखी बनली असून, उन्हाळ्याच्या काळात वरच्या भागातील म्हणजे भवानीनगर पासून निरेपर्यंतच्या भागात उन्हाळ्याच्या आवर्तनाची तारांबळ शेतकऱ्यांची होत आहे, तर दुसरीकडे रायतेमळ्याच्या खालच्या भागात म्हणजे इंदापूर तालुक्यातील उर्वरित भागात देखील पिके तहानलेली आहेत.
अशा दोन्ही ठिकाणी पाणी द्यावे लागणार असून अशातच हा कालवा फुटल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. मात्र हे काम रात्रंदिवस युद्धपातळीवर होणे अपेक्षित असताना मातीचा बांध घालून पाटबंधारे खात्याचे कोणीही कर्मचारी येथे उपस्थित नव्हते. त्यामुळे रात्री बांध कसा फुटला हे कोणालाच सांगता येत नाही.
हा बांध फुटल्याने पुन्हा त्या घळीतून अधिक वेगाने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोचले आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसापूर्वी अथवा चार दिवसापूर्वी जेवढे नुकसान झाले होते, त्याच्या दुप्पट नुकसान आता होणार आहे अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आताही कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे आणि आता या परिस्थितीमध्ये लगेचच पाणी कमी होणार नसल्याने आता देखील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. काही दिवसांपूर्वीच डावा कालवा फुटल्याने काही ठिकाणच्या शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली होती.