सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांची माहिती!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या विद्यमान उपाध्यक्षा सविता आप्पा ताडगे यांचे संचालक पद अपात्र ठरवण्यात आले आहे. तीन अपत्य असल्याची माहिती लपवली असा ठपका ठेवत त्यांचे संचालक पद अपात्र ठरवण्यात आले आहे. अशी माहिती दौंड सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी दिली.
दौंड खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षा सविता ताडगे या राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांच्या खंदे समर्थक आहेत. त्यांचे संचालक पद अपात्र झाल्याने दौंड राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दौंड तालुका खरेदी विक्री संघावर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्वाद वर्चस्व आहे.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजप आमदार राहुल कुल गटांचा पराभव केला होता. दौंड खरेदी विक्री संघावर नानगाव येथील अध्यक्षपदी विश्वास भोसले व उपाध्यक्षपदी केडगाव येथील सविता ताडगे यांची निवड करण्यात आली होती.
मात्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सचिव व अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे कार्यकर्ते नितीन भिकू सोडनवर (रा.बोरीपार्धी ता दौंड जि.पुणे) यांनी दौंड सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सौ. सविता आप्पा ताडगे यांनी तीन अपत्य असून प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत त्यांचे पद रद्द करण्याची लेखी मागणी १७ जानेवारी २०२३ रोजी पत्राद्वारे केली होती.
त्यांनी केलेल्या पत्रानुसार दौंड सहकारी संस्थेचे संस्थेचे सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी याबाबत सुनावणी घेतली होती. याबाबत सादर करण्यात आलेले जन्म दाखले व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. सविता ताडगे यांनी दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याचे व त्यापैकी एक अपत्य हे सप्टेंबर २००२ नंतर जन्मले असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क १ (फ) (७) अन्वये निरर्हता प्राप्त झाल्याने त्यांना दौंड तालुका खरेदी विक्री संघ, मर्यादित केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या संघाच्या समितीचे सदस्य म्हणून अपात्र घोषित केले आहे. तसेच समितीचे सदस्यत्व बंद झाल्यापासून समितीच्या पुढील पाच वर्षाच्या मुदतीच्या कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास, पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्विकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाहीत असे आदेश सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी दिले आहेत.