शेतीपिकांचे व फळबागांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : अवकाळी आलेला गारांचा पाऊस व चक्री वादळाने नुकसान झालेल्या भागात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. इंदापूर येथील मोरे वस्तीवर वीज पडून नारळाच्या झाडाची झालेल्या नुकसानीची पाहणी केली.इंदापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी पाटील यांनी शासनाकडे केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री यांच्याशी आपण संपर्क केला असून त्यांनीही ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
परवा रात्री इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता. इंदापूर नजीक मोरे मळा येथे बाळासाहेब मोरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला होता. वीज पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. हर्षवर्धन पाटील यांनी काल मोरे मळा वस्तीवर येऊन परिसराची पाहणी केली तसेच उपस्थितांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘इंदापूर तालुक्यात अचानकपणे काल सर्व भागात चक्रीवादळ व गारासह पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जनावरे जखमी झाले आहेत. फळबाग व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याचे ताबडतोब पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीची मदत मिळावी.
सणसर भागात कालवा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे, त्याचेही पंचनामे करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी संपर्क केला असुन त्यांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.