किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर ( ता इंदापूर )येथील जयदीप नितीन काटकर याने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांचे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 18 वर्षाखालील सायकलिंग स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले.
हरियाणा राज्यातील पंचकुला येथील मोरनी हिल्स या डोंगरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अत्यंत खडतर, ओबडधोबड आणि तीव्र उतार, चढ, दगड धोंडे अशातून रस्ता काढत ही स्पर्धा खेळली जाते. यामध्ये जयदीप याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. दिनांक 28 ते 30 मार्च च्या दरम्यान झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशातील 28 राज्यांमधून या स्पर्धेसाठी स्पर्धक आले होते.
या अगोदर जयदीप ने शालेय पातळीवर राज्य स्तरावरील स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सी एफ आय) च्या वतीने महाराष्ट्रातून जयदीपची निवड करण्यात आली. प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी अंगी असल्यावर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. भविष्यात इंटरनॅशनल स्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. त्या दृष्टीने सराव चालू असल्याचे जयदीप ने सांगितले. जयदीपला अँड. तुषार निंबाळकर व बिरू भोजने यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातून, सामान्य शेतकरी कुटुंबातील जयदीप याने केलेल्या कामगिरीबद्दल परिसरातून त्याचे कौतुक केले जात आहे.