दौंड : महान्यूज लाईव्ह
हॅलो.. मी यवत पोलीस ठाण्यातून पोलीस नाईक अजित इंगवले बोलतोय.. तुमचेच पैसे एटीएम मधून काढताना तुम्हाला मिळाले नव्हते; बरोबर ना?.. हा फोन आला आणि लडकतवाडीतील बँक खातेधारकाला अनपेक्षित सुखद धक्का बसला.. आठ महिन्यापूर्वी एटीएम मधून पैसे आले नाहीत, म्हणून एटीएम केंद्रातून बाहेर गेलेल्या त्या व्यक्तीला आठ महिन्यानंतर कोणीतरी येऊन आपले पैसे परत करेल याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. मात्र सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद अगदी मनाशी बिंबवून एका पोलीस कर्मचाऱ्याने याचा प्रामाणिकपणे आठ महिने शोध घेतला होता..!
पोलीस एखादा गुन्हा शोधताना त्याच्या अगदी मुळाशी जातात. येथे गुन्हा नव्हताच, तर एका बँकेच्या खातेधारकाचे पैसे त्याच्या नजरचुकीने आणि एटीएम मधून उशिरा पैसे बाहेर आल्याने तसेच अडकून पडले होते. खरे तर दुसरा कोणी असता तर त्याचा गैरफायदा ही घेऊ शकला असता; पण पैसे कायद्याचा रक्षक असलेल्या प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात पोहोचले होते. तो प्रामाणिक कर्मचारी होता.. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अजित कुमार इंगवले!
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित इंगवले यांना आठ महिन्यांपूर्वी यवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता दहा हजार रुपये सापडले होते. ते पैसे त्यांनी संबंधित व्यक्तीला परत केले. त्यासाठी त्यांनी घेतलेला शोध मात्र खरोखरच इंगवले यांच्या ग्रेट पोलिसिंग चा एक महत्त्वाचा भाग मानावा लागेल.
लडकतवाडी येथील अविनाश बोराटे यांनी यवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी दहा हजार रुपये एटीएम मधुन काढले, मात्र मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे पैसे मशीन मधून बाहेर न आल्याने ते परत गेले, काही वेळाने यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित इंगवले हे या एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना यावेळी या मशीन मध्ये दहा हजार रुपये सापडले.
इंगवले यांनी ते पैसे तसेच घरी नेऊन कपाटात सुरक्षित ठेवले. इंगवले यांनी याच एटीएमच्या तांत्रिक बाजू समजून घेत ज्या कोणी दहा हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांची गरज निकडीची होती हे लक्षात ठेवले आणि त्यांनी विविध बँकांमध्ये जाऊन याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बँकांची माहिती घेऊन व कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांना हे पैसे लडकतवाडी येथील अविनाश बोराटे यांचे आहेत असे लक्षात आले.
शनिवारी (दि.८) अविनाश बोराटे यांचे ते पैसे आहेत, हे समजल्यानंतर त्यांनी बॅंकेची आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करून ते पैसे बोराटे यांचेच असल्याची खात्री पटल्यावर त्यांना सापडलेले दहा हजार रुपये परत केले. दरम्यान, पोलीस नाईक अजित इंगवले यांच्या या प्रामाणिकपणाचे यवत पोलीस ठाण्यासह परिसरात कौतुक केले जात आहे.