इंदापूर, बारामती- महान्यूज लाईव्ह
दिवसभर ढगाळ हवामानानंतर आज अचानक संध्याकाळी अचानक आभाळ भरून आले आणि इंदापूर तालु्क्यात गारांसह पाऊस पडला, तर बारामती तालुक्यातही काही भागात वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. इंदापूर तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे.
इंदापूर तालुक्यात रात्री आठ नंतर पावसाला सुरवात झाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे बरेच नुकसान झाले. तालुक्यातील हिंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेचे छप्पर उडाले. तर इंदापूर शहरानजिक असलेल्या मोरेमळ्यात नारळाच्या झाडावर वीज कोसळली.
मोरेमळ्यातील मनोज मोरे यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने परिसरातील नागरीक हादरले. तर बोरी भागातील सर्जेराव शिंदे या शेतकऱ्याच्या शेतातील पेरूच्या झाडावर देखील वीज कोसळली. तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्या्ने ९ मार्च २०१४ प्रमाणे आताही पुन्हा रात्रीच्या अंधारात तुफान गारपीट होईल की काय अशाी भिती शेतकरी व्यक्त करीत होते.
बीड जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या गारपीटीचा अनुभव ताजा असतानाच गारा पडल्याने ही भीती वाढली होती. दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने बहुतांश ठिकाणी वीजेचा पुरवठा खंडीत झाला होता.