दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील दोन प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी पुणे येथील व्यापाऱ्याची शेतजमीन खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता, मात्र मागील दोन वर्षापासून त्यातील आरोपी व्यापारी फरार होते, त्यापैकी फरार असलेल्या एका फरारी आरोपीस यवत पोलिसांनी अटक केली. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
जितेंद्र मेघराज मुनोत (वय ५५ रा. सिंधी गल्ली, स्वाती स्मृती निवास, दौड, ता. दौड, जि. पुणे ) असे अटक केलेला आरोपीचे नाव असून हा दौंड शहरातील नामांकित व्यापारी आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे येथील व्यापारी शिरीष जिजाबा मोहिते, विलास कामठे यांना सन 2020 मध्ये हरीष हसमुख रांभीया व जितेंद्र मुनोत यांनी विकलेल्या बनावट शेतजमीनीचे हे प्रकरण आहे.
मौजे खराडेवाडी (ता. बारामती जि. पुणे ) येथील शेतजमीन गट क्रं. १८९ मधील १९ एकर ०९ गुंठे जमीनीचे खरेदीखत करून देतो, म्हणून त्यापैकी १६ एकर क्षेत्र भोगवटा वर्ग २ असताना देखील सदची जमीन भोगवटा वर्ग १ असा असा बनावट ७/१२ तयार केला व त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय केडगाव येथे खरेदीखत करून दिले व ३ एकर ९ गुंठे या क्षेत्राचे कुलमुखत्यार पत्र व साठेखत केले, परंतु त्याचे खरेदीखत करून न देता तीच जमीन कपटीपणाने व फसवणूक करण्याच्या इरादयाने परत रोहल दिपक सोनगिरा व दत्तात्रेय दगडू पाटील यांना दस्त क्रं. ३४९६/२०१८ दि. १०/०७/२०१८ रोजी विक्री केली.
यामध्ये शिरीष मोहीते व त्याचे मित्र विलास साहेबराव कामठे यांची ९६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी हरेश हसमुख रांभिया व जितेंद्र मुनोत या दोघांविरुद्ध सन २०१७ ते सन २०२० च्या दरम्यान घडलेल्या प्रकारावरून १६ जुन २०२० रोजी शिरीष मोहिते यांनी फिर्याद दिल्याने यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून हे दोघेही फरार होते. यापैकी जितेंद्र मुनोत याला पोलिसांनी अटक केली असून त्याला दौंड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा फरारी आरोपी हरीश रांभिया याचा पोलीस शोध घेत असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
दरम्यान, हे दोघे ही आरोपी दौंड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असून यांनी दौंड तालुक्यात व इतर तालुक्यांमध्ये अनेक शेतकरी व नागरीकांची फसवणूक केली असल्याची तक्रारी आहेत. पोलिसांनी या दोघांची सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.