सासवड : महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यात पिसर्वे येथील पत्रकार संदीप बनसोडे यांना टोळक्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडून सासवड येथील बापू जाधव व त्याच्या साथीदारांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलीस ठाण्याकडून दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.७ एप्रिल रोजी) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पत्रकार संदीप बनसोडे हे आपल्या मामाच्या दुचाकीवरून सासवडहून पिसर्वेला जात होते. या दरम्यान एखतपूर चौफुल्याजवळील रस्त्यावर दोन मोठे गतिरोधक असल्याने त्यांचे मामा दत्तात्रेय वाघमारे यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या स्कर्पिओने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
यावेळी झालेल्या अपघाताचा संदीप बनसोडे यांनी जाब विचारला असता, स्कर्पिओतील बापू जाधव (रा. सासवड) याच्यासह त्याच्या सहा ते सात अज्ञात साथीदारांनी संदीप बनसोडे व त्यांचे मामा दत्तात्रेय वाघमारे यांना लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. या घटनेची फिर्याद संदीप बनसोडे ( वय ४८ रा.पिसर्वे ) यांनी सासवड पोलीस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी बापू जाधव यासह त्याच्या अज्ञात साथीदारांच्या विरोधात भा.द.वि. १४३, १४७, १४८, १४९ तसेच ३२४, २७९, ३३७, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र सर्वच आरोपी फरार आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एल. वाय. मुजावर हे करीत आहेत.
पत्रकारांकडून निषेध व्यक्त…
जेष्ठ पत्रकार संदीप बनसोडे यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.