दौंड, महान्युज लाईव्ह
राज्यातील सर्वात मोठ्या येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेसाठी व देवदर्शनासाठी गेलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या बसला दौंड तालुक्यातील पुणे- सोलापूर महामार्गावरील मळद येथे अपघात झाला. या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे दर्शन करून तुळजापूरला जाऊन देवदर्शन करून ही खासगी बस परत निघाली होती. ही निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मळद गावच्या हद्दीत पलटली.
आज पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली. ही बस पुणे काशिवाडी येथे निघाली होती. जखमी प्रवाशांना दौंड येथील पिरामीड हॉस्पिटलमध्ये तर ५ प्रवाशांना भिगवण येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, सहायक फौैजदार शंकर वाघमारे, किरण शिंदे, आबा शितोळे, राजू भिसे व पाटस टोलनाक्याच्या पेट्रोलिंग पथकाचे कर्मचारी पोचले असून मदतकार्य करीत आहेत.
या बसमध्ये ५० प्रवासी होते. त्यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली असून या घटनास्थळी दौंड व कुरकुंभचे पोलिस पोचले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले असून हे सर्व प्रवासी पुणे जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.