ना. भाजप… ना राष्ट्रवादी.. पुणे जिल्ह्यात चर्चा एका अप्पासाहेबाची..!
इंदापूर – महान्यूज लाईव्ह
एकीकडे बारामतीच्या बाजार समितीच्या निवडणूकीत बलाढ्य राष्ट्रवादीला भाजपनं अडवलं.. डिवचलं.. तिथे शेजारच्या इंदापूरात लढायचं सोडून दिलं..! दुसरीकडे डोळ्यात तेल घालून बारामतीच्या बाजार समितीत लक्ष देणाऱ्या राष्ट्रवादीनेही या बाजार समितीकडची नजर दुसरीकडे वळवली.. साहजिकच राज्याच्या बाजार समित्यांच्या निवडणूकीत इंदापूर चर्चेत आले नसते, तरच नवल..!
इंदापूरच्या बाजार समितीच्या निवडणूकीच्या निमित्ताने आजी-माजी आमदारांच्या सध्या सुरू असलेल्या राजकीय लढाईत एरव्ही काडीचाही रस न दाखविणाऱ्या अप्पासाहेब जगदाळे या नावाची चर्चा मात्र पुणे जिल्ह्यात आहे. बाजार समितीच्या निवडणूकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप अथवा राष्ट्रवादीच्या समर्थकांनी अर्ज तर भरले.. मात्र केंद्रबिंदू अप्पासाहेब जगदाळे या नावाभोवतीच फिरतोय.
दुसकीकडे खुद्द सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप या बाजार समितीच्या निवडणूकीत उतरणार नसल्याचे चक्क पत्रकार परीषद घेऊन स्पष्ट केले. यातून अनेक अर्थ येणाऱ्या काळात काढले जातील, भाजपच्या विचाराचा कोणीही या निवडणूकीत नाही असे त्यांनी सांगितले.. का सांगितले? याचा अर्थ आता अप्पासाहेब जगदाळे हे त्यांच्यासमवेत नाहीत काय? या चर्चेलाही उधाण आले आहे, दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी असलेले अप्पासाहेबांचे संबंध ही बाजूही या निवडणूकीत महत्वाची ठरणार अशीही चर्चा आहे. अप्पासाहेब जगदाळे मात्र यासंदर्भात आतापर्यंत काहीही बोललेले नाहीत हे विशेष!
अर्थात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिनविरोध झाला, त्यावेळीच आपण तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका अशाच झाल्या पाहिजेत अशी आपली भूमिका स्पष्ट केली होती असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट करीत आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांनी एका वाक्यावर दोन,तीनदा भर दिला.. ते वाक्य होते की, आमच्याशी कोणीही चर्चा केलेली नाही..!
दुसरीकडे राष्ट्रवादीकडून कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र ग्रामपंचायतींच्या गटातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिक संख्येने अर्ज भरलेले आहेत किंवा सोसायटी प्रवर्गातूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेले आहेत, अगदी मोहोळचे आमदार यशवंत माने असतील किंवा आमदार दत्तात्रेय भरणे यांचे बंधू मधुकर भरणे असतील, त्यांनीही अर्ज भरलेले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अप्पासाहेब कार्यकर्त्यांच्या घोळक्यात दिसले.. अगदी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्ते त्यांच्यासमवेत दिसले.. असे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सामावून घेणारे अप्पासाहेब मागच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी दिसले नव्हते..
अर्थात अप्पासाहेब जगदाळे यांचे इंदापूर तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये मोठे वजन आहे. त्यामध्ये वर्चस्व आहे. साहजिकच ते पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणूकीतही इंदापूरातून बिनविरोध निवडून आले, त्यामागेही त्यांची हीच ताकद कारणीभूत होती.
मागच्या विधानसभा निवडणूकीच्या काळात राष्ट्रवादीतील अप्पासाहेब भाजपबरोबर गेले.. मात्र त्यानंतरही त्यांचे बाजार समितीवरील वर्चस्व कायम राहीले. ते वर्चस्व अगदी आजपर्यंत कायम राहीले. अप्पासाहेब जगदाळे यांनी बाजार समितीतही काम प्रभावीपणे केले.
कदाचित म्हणूनही असेल, पण भाजप अथवा राष्ट्रवादी थेट अप्पासाहेबांना नाराज करू इच्छित नसावी, उद्याचे राजकारण काहीही असले, तरी बाजार समितीच्याच नाही, तर इंदापूरच्या राजकारणात मात्र अप्पासाहेबांना दुर्लक्षून चालणारच नाही एवढी त्यांची जादू आहे..!
एकंदरीतच या आठवड्यात बाजार समितीच्या निवडणूकीचे सगळे चित्र स्पष्ट होईल, तेव्हा अप्पासाहेब नावाचा डंका आणि याच नावाची जादू फक्त इंदापूर नाही, तर पुणे जिल्ह्यातही दिसून येईल असेच चित्र दिसत आहे.