इंदापूर : महान्यूज लाईव्ह
फक्त पंधरा दिवसातच दुरुस्ती केलेला निरा डावा कालवा इंदापूर तालुक्यातील सणसर मधील रायते मळा भागात पुन्हा फुटला आहे. या ठिकाणी असणाऱ्या मोरीतील दगड वारंवार निघत असल्याने निरा डावा कालवा आतूनच फुटत आहे. आज पहाटे हा कालवा पुन्हा फुटला.
पंधरा दिवसांपूर्वीच सणसर येथील या मोरी मध्ये दगड निखळून निरा डावा कालवा फुटला होता. यातून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याला अद्याप पंधरा दिवसही उलटत नाहीत, तोच दुरुस्ती केलेल्या ठिकाणीच पुन्हा घळ पडली असून, हा कालवा फुटल्याने रस्त्यावर पाणी पुन्हा भरून वाहू लागले आहे.
या कालव्याची ही मोरी सध्या जलसंपदा विभागाची देखील डोकेदुखी बनली असून, आताही कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे आणि आता या परिस्थितीमध्ये लगेचच पाणी कमी होणार नसल्याने आता देखील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. काही दिवसांपूर्वीच डावा कालवा फुटल्याने काही ठिकाणच्या शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली होती.
आता खरी गंमत येईल..
निरा डावा कालवा फुटल्यानंतर इंदापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र अजून त्यावर नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता पुन्हा शेतकऱ्यांना हा मोठा दणका बसणार आहे. मात्र आता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास, त्यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना नुकसान भरपाईचा प्रश्न अग्रहक्काने विचारला जाईल.